रविवार, ३० डिसेंबर, २०१८

बदलांची भाषा आणि भाषेतील बदल

(यंदा दिवाळी अंकात प्रकाशित झालेला माझा एक लेख)
----------------------------------------------------------------------------------




भाषा हे माणसाचे व्यक्त होण्याचे आदिम साधन आहे. अगदी अश्मयुगातला माणूसही त्याच्या दैनंदिन व्यवहारांसाठी कोणती ना कोणती भाषा वापरतच असला पाहिजे. मग ती भाषा शब्दांची असेल, हावभावांची किंवा ठराविक स्वरांची; पण भाषा असणार नक्की. अंदमानसारख्या बेटांवर आजही आदिम अवस्थेत जगणाऱ्या जरावासारख्या वनवासी जमातींचीही स्वत:ची भाषा आहे, संवादाची तऱ्हा आहे. भाषा हे प्रामुख्याने बोलण्याचे आणि ऐकण्याचेच साधन आहे. लिहिणे- वाचणे हा उपचार त्यात फार उशिरा आला. लिखित स्वरूप प्राप्त होताच, त्याचे प्रमाणिकरण होऊ लागले. काय योग्य, काय अयोग्य, याचे शास्त्र तयार झाले आणि बोललेले अधिक काळ स्मरणात ठेवण्यासाठी लिहून ठेवणे, हा लिखाणाचा मूळ उद्देश बाजूला पडून; लिहिल्याप्रमाणे बोलणे, असा उलट प्रवास सुरू झाला. हा प्रवास प्रवाहीपणास खीळ घालणारा आणि म्हणूनच कोणत्याही भाषेच्या जिवंतपणास मारक ठरणारा आहे. कारण प्रवाहीपणा हेच जिवंतपणाचे लक्षण आहे. प्रत्येक जिवंत गोष्ट ही प्रवाही असतेच. मग भाषा त्याला अपवाद कशी ठरेल. सध्या मराठीत आणि सर्वच भारतीय भाषांमध्ये होणाऱ्या स्थित्यंतरांबाबत आरडाओरड करताना, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
   ‘आमच्या वेळी अशी भाषा नव्हती, शी काय आजची भाषा,’ अशा तुकड्यानेच बोलणे सुरू करणारी मंडळी ते आदर्श म्हणून सांगत असलेल्या कालखंडातही भाषेबाबत असाच ओरडा होत होता, नव्हे तो प्रत्येकच काळात होत राहिला आहे, हे विसरतात. कालच्यापेक्षा आजची आणि आजच्यापेक्षा उद्याची भाषा वेगळी असणारच, कुणीही कितीही आटापीटा केला, तरीही हे बदल अटळ आहेत आणि ते नाकारणारी भाषा मृतप्राय होते किंवा बाजूला पडते. त्यामुळे सध्या सर्वच क्षेत्रांत झपाट्याने होणारे बदल जी भाषा अंगिकारेल किंवा ते बदल सामावून घेण्यासाठी सक्षम होईल, तीच भाषा टिकेल, तगेल आणि वृद्धिंगत होईल, हे वास्तव आहे.
   इथे एक गोष्ट मात्र कायम ध्यानात ठेवली पाहिजे की, बदल समावून घेणे, स्वीकारणे आणि बदलांत वाहून जाणे, या दोन अतिशय भिन्न गोष्टी आहेत. देशी भाषांच्या संवर्धनासाठी झटणारे कार्यकर्ते, भाषाप्रेमी आणि नको तितके आधुनिक झालेले भाषिक स्वैराचारी यांच्यात खटका उडतो, तो याच गोष्टीवरून. भाषाप्रेमी बदल स्वीकारणे आणि स्वैराचारी त्यात वाहून जाणारे. ‘एक तुतारी द्या मज आणूनि’ म्हणणारे आधुनिक मराठी काव्याचे जनक केशवसूत यांनी बदल स्वीकारले म्हणूनच ते सुनीते मराठीत आणू शकले, शिरवाडकरांनी बदल स्वीकारले म्हणून नटसम्राट मराठीत आले, विंदांनी बदल स्वीकारले म्हणून ते तुकोबांच्या भेटीला शेक्सपिअरला आणू शकले. गझलकार सुरेश भट, हायकुकार शिरीष पै, यातल्या कुणावरही मराठीची वाट लावल्याचा आरोप करता येईल का? उलट मराठी संपन्न केल्याबद्दल त्यांचे आजवर कौतुकच होत आले. याचे कारण त्यांनी परभाषेतील साहित्य मराठीत आणले, नवे बदल स्वीकारले, नवे साहित्य प्रकारही स्वीकारले, पण हे सर्व करतानाच मराठीचा लहेजाही सांभाळला. आज मात्र बदल स्वीकारणे याचा अर्थ परभाषेतील संज्ञा, शब्द, विचार, तत्त्व स्वभाषेत जसेच्या घुसडणे असा झाला आहे. सरमिसळ ही दुधात साखरेसारखी हवी, त्याने दुधाचा गोडवाही वाढावा आणि त्यांनी दुधाशी समरसून जावे. सध्या दुधात लिंबू पिळण्याचे प्रकार सुरू असलेले बऱ्याचदा दिसते. त्याने दुधाचे गुणवर्धन न होता ते नासण्याचेच काय ते काम होऊ शकते. सध्याची मराठी चित्रपट, नाटकांची नाव पाहिली, तरीही या प्रकाराचे गांभीर्य लक्षात येईल. ‘दिल अभी भरा नही’, ‘जादू तेरी नजर’, ‘चॅलेंज’ या नाटकांच्या शीर्षकांनाही हिंदी- इंग्रजीच्या आधार का घ्यावासा वाटावा? असे काय वेगळेपण आहे, या शीर्षकांमध्ये जे मराठी नावांतून दाखविता आले नसते. ‘दिसून येते, आढळून आले, माहिती पुढे आली’ ही थेट इंग्रजी शैलीची क्रियापदे वापरण्याची पद्धत सर्वच मराठी वृत्तपत्रांमध्ये रुढ झालेली दिसते. त्याऐवजी ‘दिसते, आढळते, कळते, निष्पन्न होते’ अशी थेट मराठमोळी रचना का करण्यात येत नाही, हे अनाकलनीय आहे. ‘अमके  - तमके असे म्हणाले की,’ अशी वाक्याची सुरुवात करण्याची हिंदी पद्धत मराठीला किती शोभते? त्याऐवजी वक्त्याचे म्हणणे सांगून शेवटी ‘अमके-अमके म्हणाले’ असे लिहिणे अधिक उत्तम वाटत नाही का? वाहिन्यांवर तर मराठीच्या चिंध्या उडताना दिसतात. ‘जसं की आपण पाहू शकता, तसं’, ‘जसं की ते म्हणाले तसं’ या हिंदीभ्रंशीत गोलगोल फिरणाऱ्या वाक्यरचनेऐवजी ‘आपल्याला दिसतयं ते’, ‘आपण म्हणतायं त्यानुसार’ ही थेट मराठी शैली किती सोपी आणि सुटसुटीत आहे.
        आता या बदलांना भाषा प्रवाही असते, तिच्यात स्थित्यंतर येणारच या नावाखाली सूट देता, येऊ शकते का? आणि तशी ती दिली गेली, तर नव्या पिढीपर्यंत जाणारी भाषा ही मराठीच असेल, याची काही खात्री देता येईल का? की हिंदीवरील अरबी – फारसीच्या प्रभावामुळे तयार झालेल्या उत्तरेतील हिंदुस्थानी अथवा उर्दू या ढेडगुजऱ्या भाषेसारखे मराठीचे स्वरूप होईल? याचा विचार प्रत्येकानेच करायला हवा. आपण आपला सर्वाधिक वेळ ‘ल आणि ळ’ किंवा ‘न आणि ण’चे उच्चार योग्य – अयोग्य करणाऱ्यांना गोंजारण्यात वा फटकारण्यात घालवतो. वस्तुत: या वर्णांचे दोन्ही उच्चार मराठमोळेच आहे. त्यामुळे ते बरोबर- चूक आल्याने फार काही आभाळ कोसळत नाही. ‘ण’चा उच्चार न करू शकणाऱ्या किंवा तो (‘णमण’ वगैरे) चुकीच्या ठिकाणी उच्चारणाऱ्यांना हसणारी मंडळी ‘प्रश्ण’ हा उच्चार मात्र सहज करून जातात आणि आपण चुकलोय हे त्यांच्या गावीच नसते. ‘ळ’चीसुद्धा तीच कथा ‘ळ’ हे वर्ण मुळात बोली मराठीतले किंवा प्राकृतातले संस्कृतात ते नाही. त्यामुळे हे वर्ण वापरून ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ असे म्हणताना; ‘खल’, हा संस्कृत शब्द सर्वसामान्यांच्या भाषेप्रमाणे ‘खळ’ असा वापरणाऱ्या ज्ञानदेवांना तत्कालीन कथित पंडितांनी बहिष्कृत ठरवले होते. आज मात्र याच ‘ळ’चा उच्चार करता येणाऱ्यांना भाषिक प्रतिष्ठा मिळते आणि ‘ल’ म्हणणारे गावरान ठरतात. असो, पण हे वाद चालतच राहणार. ‘वादवादे जायते तत्वबोध’ हे आपल्या संस्कृतीचे सूत्रच असल्यामुळे असे वाद हवेतच. त्याविना भाषेचा विकास व्हायचा नाही. मुद्दा हा आहे की, या वादात पटापट आणि निकराने उड्या घेणाऱ्या मंडळींच्या नाकाखालून मराठीला विक्षिप्त आणि विकृत वळण लागत आहे. तरीही ते प्रमाणभाषा की बोलीभाषा याच वादात अडकून पडले आहेत.
         आज जागतिकीकरणाच्या रेट्यात या भाषेतील शब्द त्या भाषेत उचलला जाणे, हे खूपच स्वाभाविक झाले आहे. पण त्यामुळे देशीभाषा केवळ क्रियापदांपुरतीच उरेल की काय, अशी भीती निर्माण होणे घातक आहे. नवे तंत्रज्ञान, नवनव्या संज्ञा, जगभरातून इतक्या झपाट्याने आपल्यापर्यंत पोहोचत आहेत की, त्यांना समर्पक देशी प्रतिशब्द पाडणे आणि ते तितक्याच वेगाचे प्रचारणे, हे मोठे आव्हानच होऊन बसले आहे. ते वृत्तपत्र, साहित्यिक, वक्ते यांनी पार पेलले नाही, तर येणाऱ्या पिढीला त्यासाठी दोषी मानता येणार नाही. मराठीतील एक-दोन निवडक वृत्तपत्रे सोडली, तर या आव्हानाची फार कुणाला जाणीवही असल्याचे जाणवत नाही. एखादी संज्ञा जागतिक पटलावर येते, तेव्हा तिला जोडून अनेक सांस्कृतिकसंदर्भही येत असतात. त्यामुळे वेळीच त्याचे देशीकरण करून घेणे आवश्यकच ठरते. तसे झाले तरच त्या संकल्पना देशात योग्यरित्या रुजतात आणि अनावश्यक सांस्कृतिक सरमिसळही थांबते. चायनीज, पिझ्झा हे पदार्थ भारतात विकले जाताना त्यात भारतीय चवींचा विचार केला जातोच, अन्यथा मूळ चवीमध्ये त्यांना भारतात टिकाव धरणेही अवघड झाले असते. तोच प्रकार भाषांच्या बाबतीतही लागू होतो.
          आजच्या भाषेला लागलेले आणखी एक वाईट वळण म्हणजे, मराठीतले सुंदर – सुंदर शब्द अत्यंत चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या अर्थाने वापरण्याचा जणू प्रघातच सध्या पडत चालला आहे. यामुळे उत्पत्तीशास्त्राच्या दृष्टीनेही सखोल असलेले आपल्या मराठीतील अनेक शब्द भविष्यात पांगळे होणार आहेत. घोडचूक हा सर्रास वापरला जाणारा शब्द खरंतर घोरचूक आहे, हे आपण विसरतो. ‘अठराविश्व दारिद्र्य’ ही संज्ञा तर आता इतकी रुजली आहे की, ते ‘अठराविशे दारिद्र्य’ असे आहे हे सांगूनही कुणाला पटणार नाही. हे झाले शाब्दिक बदल, आता अर्थदृष्ट्या झालेले काही विकृत बदल पाहूया. प्रभृती या शब्दाचा अर्थ आदी, इत्यादी असा आहे; परंतु आज तो चक्क महान, महनीय व्यक्ती या अर्थाने वापरला जातो. त्यामुळे ‘या वेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री, राज्यपाल, सचिव, आदी प्रभृती उपस्थित होती.’ अशी वाक्य आपण आघाडीच्या वर्तमानपत्रांतून नियमित वाचतो. ‘रुजुवात’ हा शब्द हल्लीचे अनेक नवीकवी सुरुवात या अर्थाने खुशाल वापरायला लागले आहेत, अरे पण रुजुवात म्हणजे पडताळून पाहाणे, खातरजमा करणे, हे त्यांना सांगूनही पटत नाही. एखादा संस्कृताळलेला शब्द असावा, या थाटात ते हा मूळचा अरबीसंकरिक शब्द वापरून ‘माझ्या प्रेमाला रुजुवात झाली’, अशी वाक्य बेधडक लिहितात. ‘दिठी’ हा शब्दही बरेच लोक दिवा या अर्थी वापरू लागले आहेत. त्याचा अर्थ दृष्टी आहे, ते जाणूनही घेतले जात नाही. असे शब्द शेकड्याने निघतील. चुकीच्या अर्थाने किंवा भलत्याच अर्थाने शब्द लिहिले जाण्याचे प्रकार पूर्वीही होत होतेच. फरक फक्त इतकाच होता की, अशा लोकांना पूर्वी प्रतिष्ठा मिळत नव्हती. आज चोखंदळ वाचकांची संख्या घटत असल्याने ती मिळू लागली आहे. हे कोणत्याही भाषेच्या भवितव्यासाठी चांगले लक्षण नाही.
         आजच्या ‘ऑनलाइन’ काळात चिन्हांची एक नवी भाषा मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. बरं, ठीक आहे, यांसारखे उद्गार तर एक ठेंगा दाखवून, व्यक्त केले जातात. शब्दांपलिकडे जाऊन, जगभरात कुठेही कळणारी ही चित्रांची आणि चिन्हांची भाषा नक्कीच स्वागतार्ह आहे. पण त्याला मर्यादा आहेत, हेही तितकेच खरे. सध्या आपण समाजमाध्यमांवर संवादासाठी वापरतो ती चिन्हे, काही अपवाद वगळता आपल्या भाषेला पूरक म्हणून वापरतो. म्हणजे, ‘मी छान आहे’ असे म्हटल्यानंतर एखादी हास्यमुद्रा किंवा शुभेच्छा दिल्यानंतर ठेंगा. या चिन्हांच्या पूरक भाषेने दूरस्थ संवादांमध्ये मसालेदारपणा आणि प्रभावीपणा वाढवला आहे, हे मानायला प्रत्यवाय नाही. नवप्रेमीयुगुले या म्हणण्याशी विशेष सहमत होतील.
      समाज माध्यमे या प्रकारामुळे रुढ माध्यमांवरील प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढून, प्रत्येकालाच स्वत:चे मत मांडण्याची, व्यक्त होण्याची संधी मिळू लागली आहे. भाषिकदृष्ट्या या संधीचा विचार करता, त्याचे फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत. कालपर्यंत कोणत्याही साहित्यावर प्रकाशनपूर्व संपादनाचा संस्कार होत असे. त्यामुळे भाषेतील आणि एकंदरच साहित्यातील त्रुटी प्रकाशनापूर्वीच दूर होत असत. पण आज विचार काय किंवा साहित्य काय थेट वाचकांपर्यंत पोहोचते. परिणामी ते बऱ्याचदा अपरिपक्व किंवा कच्च्या स्वरूपाचे असते. भाषाही बाळबोध असते. अशा वेळी नीर-क्षीर विवेक बाळगणारा चोखंदळ वाचक अधिक महत्त्वाचा ठरतो. तो आपल्या जवळपास नसला, तर गल्लीबोळात साहित्यिक आणि विचारवंताची पिके निघायला लागतात. अशा सुमारांची सद्दी आपण फेसबुक आणि ब्लॉगवर झालेली पाहातोच.
          दरम्यान, गेल्या काही वर्षांत समाज माध्यमांतसुद्धा अनेक स्थित्यंतरे येताना आपण पाहत आहोत. सुरुवातीला ऑर्कूटसारख्या संकेतस्थळांवर किंवा नव्याने आलेल्या ब्लॉगरवर भारंभार लिखाण करण्यावर लोकांचा भर होता. मोठी जागा आहे, त्यामुळे वाट्टेल ते आणि वाट्टेल तितके लिहा, अशी सुरुवातीची धारणा होती. अगदी वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांवरही कितीही मोठा लेख येऊ द्या, असे लेखकांना सांगितले जात होते. मात्र आता तेथील भाषेलाही हळूहळू वळण लागत आहे. नियमित ब्लॉग लेखक, त्यांची शैली, त्यांची भाषा आणि त्यांचे चाहते तयार होत आहेत. त्यामुळे जागा कितीही असली, तरीही अमुक एका मर्यादेपलिकडे नेटवर वाचले जात नाही, हे लक्षात घेऊन लिखाण केले जात आहे. भाऊ तोरसेकरांसारखे पत्रकारांनीही ब्लॉगच्या माध्यमातून तब्बल एक कोटी वाचकांपर्यंत पोहोचण्याची किमया साधली आहे. ‘द वायर’सारखी ऑनलाइन पोर्टल तुफान गाजत आहेत. साहजिकच ऑनलाइन माध्यमांची एक नवी भाषा आकार घेत आहे. इथे लिहिण्यासोबतच तुमच्या म्हणण्याच्या पृष्ठर्थ तुम्हाला ऑनलाइन मजकूर, चित्रफिती, छायाचित्र आदींचे दुवे देता येत असल्यामुळे वाचकांनाही विविध संदर्भ जिथल्या तिथे पडताळून पाहाता येत आहेत. त्यातच ट्विटरसारख्या माध्यमांतून तर १४० शब्दांच्या मर्यादेत आणि हॅशटॅगकरून लिहिण्याची एक नवी पद्धत विकसित झाली आहे. त्यामुळे कमीत कमी शब्दांत आपले म्हणणे मांडण्याची आणि ते समजून घेण्याची सवयच या मंडळींना लागली आहे. अर्थात ट्विटरसारखे माध्यम हे काही भाषा- साहित्य प्रसाराचे साधन नाही. ते फक्त आपले मत किंवा बातमी दुसऱ्यापर्यंत पोहोविणारे माध्यम आहे. त्यामुळे येथील लिखाणाच्या भाषिक वैशिष्ट्यांची चिकित्सा करण्याचे काही प्रयोजनच नाही. मात्र येथे एक अवश्य नमूद करता येईल, या १४० शब्दांच्या मर्यादेतसुद्धा उत्कृष्ट भाषिक नमूने ठरू शकतील, असे ट्विट करणारे काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यासारखी किंवा पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यासारखी मंडळी आहेत.
        तांत्रिक कारणांमुळे काही वर्षांपूर्वी मोजक्या शब्दांत पाठवावे लागणारे तार संदेश, त्यानंतर पेजर, भ्रमणध्वनीच्या काळातील लघुसंदेशांतील शब्दमर्यादा असे सगळे टप्पे ओलांडून ईमेल आणि ब्लॉग या अमर्याद शब्दसंख्येसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या माध्यमापर्यंत आल्यानंतर; आता माणसाला पुन्हा मर्यादित शब्द संख्येची ट्विटरची चौकट हवीहवीशी वाटू लागली, हे आश्चर्य आहे. आज आम्हाला कोणतेही बंध नकोत, स्वैराचारी जिणे हवे, मनमौजीपणा हवा, असा कांगावा करत पुढे- पुढे चाललेल्या आपल्या समाजालाही काही दशकांनी असेच पुन्हा आपणहून मर्यादांच्या चौकटी यावेसे, वाटेल का! कारण व्यवस्थेच्या मर्यादा उलंघू पाहणाऱ्या याच समाजाने कधीकाळी त्या मर्यादा निर्माणही केल्या आहेत. ही वर्तुळाकार स्थितंतरे पिढ्यानपिढ्या अशीच सुरू आहेत, सुरू राहतील; कारण काळ अमर्याद आहे, कदाचित मानवी आकांक्षांपेक्षाही..!

-        संकेत सातोपे
(सौजन्य : विश्व संवाद केंद्र, मुंबई)

गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

इच्छा मरण, समाधी, देहत्याग, वगैरे.. वगैरे...

मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने काही अटींवर इच्छामरणालापरवानगी दिल्यानंतर, याबाबत नव्याने चर्चेची वादळे उठली आहेत. इच्छा मरणाची गरज खरंच आहे का, ते न्याय्य आहे का, त्याला वैधानिक संमती मिळाल्यानंतर त्याचा गैरवापर होणार नाही का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत; पण या प्रश्नांची उत्तरे अन्य कोणत्याही सामाजिक निर्बंधांप्रमाणेच सापेक्ष आहेत. त्यामुळेच अन्य सामाजिक प्रश्नाप्रमाणेच यासंदर्भातही मागे वळून पूर्वसुरींनी घालून दिलेल्या पायंड्याचे मासले तपासणे अधिक उद्बोधक ठरते. जसे की, लिव्ह इन रेलेशनशीपच्या वैधानिक मान्यतेबाबत निकाल देताना, न्यायालयाने राधाकृष्णाचा दाखला दिला होता. इच्छा मरणाच्या या ताज्या निकालाबद्दलही भारतीय सांस्कृतिक- ऐतिहासिक संदर्भ तपासून पाहता असे दिसते की, मरण अडवून धरणाऱ्या भीष्माचार्यांपासून ते ओढावून आणणाऱ्या कुमारील भट्ट, आद्य शंकराचार्य, ते अगदी ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत अनेक महात्म्यांनी इच्छामरण या संकल्पनेचा यथायोग्य उपयोग केला. आत्महत्या कोणत्याही संस्कृतीने त्याज्य आणि निषेधार्हच मानली आहे, पण नैसर्गिक मृत्यू येण्याआधी स्वेच्छेने जीवन संपविण्याच्या प्रत्येक क्रियेला आत्महत्या मानण्यात आलेले नाही. आपले इप्सित साध्य होण्यात अपयश आले, गोष्टी मनाविरुद्ध घडत आहेत, म्हणून निराश होऊन जीव देण्याला आत्महत्या मानण्यात येते. पण आपण योजिलेल्या जीवितकार्याची पूर्तता झाली, म्हणून समाधानाने स्वेच्छेने जीवन थांबविणे, याला समाधी किंवा आत्मार्पणच मानले गेले आहे.
भावार्थ दीपिका, अमृतानुभवासारखे ग्रंथ लिहून, समाज प्रबोधनाचे मोठे कार्य उभे केल्यानंतर जीवनाची इतिकर्तव्यता झाल्याचे जाणवताच ज्ञानेश्वर माउलींनी ऐन तारुण्यात समाधी घेतली. अशीच कथा आद्य शंकराचार्यांचीही, अद्वैत मताचा भारतभर पुरस्कार करून, देशात चार दिशांना चार पीठांची स्थापना केल्यानंतर शंकराचार्यांनी थेट गृहप्रवेश करून, आपला ऐहिक प्रवास थांबविला. पश्चिम बंगालमधील वैष्णव मताचे कट्टर पुरस्कर्ते चैतन्य महाप्रभूंची आत्मर्पणाची कथा तर फारच रोचक आहे. श्रीकृष्ण भक्तीभावात तल्लीन होऊन भजन गात गात भक्तांसमवेत वाटेने चालत असतानाच अचानक महाप्रभूंनी समुद्रात उडी घेतली आणि ते समाधिस्थ झाले. संत एकनाथ महाराजांनीही अशाच प्रकारे नदीत समाधी घेतली होती. कार्यपूर्तीनंतर देहत्याग केल्याची जशी संतांची अनेक उदाहरणे आहेत, तशीच उदाहरणे देशभक्तांचीही पाहाता येतील. यातील चटकन आठवणीत येणारे नाव म्हणजे चंद्रशेखर आझाद. ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबारात जखमी होऊन, घेरले गेलो आहोत आणि आता निसटणे अशक्य आहे, हे लक्षात येताच आझाद यांनी स्वतःच्याच डोक्याला पिस्तुल लावले. गोऱ्यांच्या हाती लागून बंदिवासात मरण्यापेक्षा स्वतःच स्वतःचा देह विसर्जित करणे त्यांना श्रेयस्कर वाटले. दिल्लीचे अखेरचे हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान आणि त्यांचा सेवक-मित्र चंदबरदायीबाबतही अशीच कथा सांगितली जाते. मोहम्मद घोरीसारख्या क्रूरकर्म्याच्या हातून मृत्यू स्वीकारण्यापेक्षा या दोन घनिष्ठ मित्रांनी अखेर कारागृहात एकमेकांची मान उडवली. शत्रूच्या हातात पडण्यापूर्वी राजपूत स्त्रियाही जोहर करून नैसर्गिक मृत्यू येण्यापूर्वी जीवन संपवीत असत. मनुष्य जीवन संपविण्यासाठी नैसर्गिक मृत्यू हा एकमेव न्याय, नैतिक मार्ग असून अन्य सर्व प्रकार हत्या- आत्महत्या या अपराधात मोडतात. अशी धारण न होण्यासाठी वरील दाखले पुरेसे बोलके आहे. शेवटी कोणतीही क्रिया योग्य की अयोग्य हे त्यामागील हेतुवरूनच ठरवता येते. त्यामुळे मानवी मृत्यू अर्थात देहान्त, हा कोणत्या क्रियेने झाला याऐवजी कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या उद्देशाने झाला यावरूनच त्याचे योग्य- अयोग्यत्व ठरविता येते. यापुढे माझ्याकडून देशकार्य होणार नाही, माझा देह केवळ भारभूत होऊनच राहील, या धारणेतून स्वा. सावरकरांनी प्रायोपवेशन(अन्नत्याग) क्रियेद्वारे पत्करलेला मृत्यू, म्हणूनच आत्महत्या ठरत नाही. त्याचप्रमाणे रुग्णालयात कितपत पडून आप्तस्वकीयांना त्रास देत केवळ श्वासोच्छ्वासापूरते जिवंत असण्यापेक्षा सुखाने मृत्यूला कवटाळले हे अयोग्य ठरत नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने यावरच मोहर उमटवली आहे. 
-संकेत सातोपे
--------------
http://m.lokmat.com/national/topic-euthanasia/

डॉक्टर होणाऱ्या नि प्रत्यक्ष डॉक्टरी करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला!

मुंबई : आधुनिकता आणि उदारमतवादाच्या रेट्यामुळे भारतीय स्त्रियांच्या पायांतील बेड्या किंचित मोकळ्या व्हायला सुरुवात झाली असतानाच्या काळात गरुड भरारी घेणाऱ्या दोघींची नावं कायम लक्षात राहतात. त्यातील एक नाव डॉ. आनंदीबाई जोशी आणि दुसरे डॉ. रखमाबाई राऊत! एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात दोघींनी तत्कालीन समाजव्यवस्थेच्या स्त्रीविषयक गैरसमजुतींना छेद देत, आपापले कर्तृत्व सिद्ध केले. या दोघीही साधारण एकाच काळात एकाच क्षेत्रातील कर्तबगार महिला म्हणून नावारूपाला आल्या. त्यासाठी दोघींना समाजाच्या धारणांशी संघर्ष करावा लागला. या साम्यस्थळांबरोबरच दोघींच्या संघर्षात सूक्ष्मभेदही आहेत. आनंदीबाई यांना थेट तत्कालीन रुढींशी संघर्ष करावा लागला आणि त्यात त्यांच्यासोबत त्यांचे पती गोपाळराव पाठीशी उभे होते. पण रखमाबाईंचा संघर्ष रुढीबद्ध तत्कालीन कायद्याशीही झाला आणि त्यात त्यांचा सर्वांत मोठा झगडा थेट पतीशीच होता.
ठाण्याजवळच्या कल्याण येथील डॉ. आनंदीबाई यांचा विवाह तत्कालीन रितीप्रमाणे नवव्या वर्षी त्यांच्यापेक्षा तब्बल २० वर्षांनी मोठ्या असलेल्या गोपाळराव जोशींशी लावून देण्यात आला. वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांच्यावर अकाली मातृत्व लादले गेले. त्यातून जन्माला आलेले मुलं काही दिवसांतच दगावले आणि वैद्यकीय शिक्षण घेण्याचे त्यांच्या मनाने घेतले. त्यामुळे अमेरिकेत एमडीच्या प्रबंधाचा त्यांचा विषयही भारतीय आर्य स्त्रीचे प्रसूतीशास्त्र हाच होता. या प्रवासासाठी लोकहितवादींसारख्या सुधारकांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या गोपालरावांनी त्यांना प्रोत्साहित केले. मात्र या प्रवासात जाचक रुढींच्या बंधनाने आनंदीबाईंचा अवघ्या एकविशीत बळी घेतला. प्रकृतीने खचलेल्या आनंदीबाईंना अमेरिकेसारख्या देशाच्या हवामानाला मानवेल असा आहारबदल याच रुढीबद्धतेमुळे करता आला नाही. त्यामुळे क्षयाची बाधा होऊन त्या दगावल्या. भारतात आल्यावरही समुद्रलंघन करून आलेली महिला म्हणून अनेकांनी नाके मुरडली. यातून त्यांच्या उपचारांकडेही दुर्लक्ष झाले. आणि डॉक्टर म्हणून प्रत्यक्ष काम करू शकण्याआधीच त्या संपून गेल्या.
दुसरीकडे, रखमाबाई राऊत यांचा डॉक्टर असलेला सुधारणावादी सावत्र पिता त्यांना प्रोत्साहित करीत होता. त्यामुळे त्यांना संकुचित- सनातनी पतिकडे न जाण्याचा निर्णयही ठामपणे घेता आला. मात्र या निर्णयाविरोधात त्यांना केवळ सामाजिकच नव्हे, तर न्यायालयीन लढही द्यावा लागला. नांदण्यास तयार नसलेल्या रखमाबाईंवर त्यांचा पती दादाजी भिकाजी याने थेट न्यायालयात खटला भरला. हे प्रकरण प्रचंड सामाजिक उलथापालथ घडविणारे ठरले. विशेष म्हणजे यात लोकमान्य टिळकांसारख्या थोर नेत्यानेही रखमाबाईला टिच्चून विरोध केला. तरीही रखमाबाईंनी न डगमगता हा खंबीरपणे हा लढा दिला. नांदायला जाणे किंवा ६ महिन्यांचा कारावास असा निकाल न्यायालयाने देताच रखमाबाईंनी कारावासाची सिद्धता दाखवली, पण नवऱ्याकडे जाण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर दोन हजार रुपयांची भरपाई पतीला दिल्यानंतर त्यांना या जाचक विवाहातून स्वतः सुटका करून घेता आली. आणि डॉक्टरीच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली. इंग्लंडमध्ये डॉक्टरीची पदवी घेऊन, भारताच्या ओढीने त्या परतल्या आणि ९० वर्षांच्या दीर्घ आयुष्यात अखेरपर्यंत त्या मुंबईत वैद्यकीय व्यवसाय करीत राहिल्या. त्यांच्या लढ्यामुळे भारतात १८९१ साली पहिल्यांदाच लग्नासाठी किमान वय बंधनकारक करणारा कायदा अस्तित्वात आला. इथे विशेषतः नमूद करायला हवे की, पतीपासून विभक्त झाल्यानंतरही त्यांनी दुसरे लग्न केले नाही आणि पतीच्या निधनानंतर त्या विधवेच्या पोषखातच राहिल्या.
आज महिला दिनानिमित्त या दोन्ही दिग्गज महिलांना अभिवादन करतानाच, प्रत्येक महिलेतील स्त्रीत्वाचा आदर करण्यास प्रेरित होणे गरजेचे आहे. कारण शौर्य, धैर्य, पराक्रम, कर्तृत्व... अशा सगळ्या स्पृहणीय गोष्टी आपण नकळत 'पुरुषत्वा'शी आणि रडवेपणा, हळवेपणा, भित्रेपणा, अशा गोष्टी 'स्त्रित्वा'शी जोडतो. म्हणूनच 'खूब लढी 'मर्दानी' वो तो झाशिवाली रानी थी।, डॅशिंग आहे हा ती एकदम, एखाद्या पुरुषासारखी किंवा रडतोस काय पोरींसारखा; तुझ्यापेक्षा पोरी बऱ्या गाडी चालवतात', अशी वाक्य आपण सहज बोलून जातो. आज स्त्रीचा सन्मान होत असेल कदाचित, पण स्त्रित्वाचा अजून तितकासा नाही. कर्तृत्ववान स्त्रीला तिच्याही नकळत 'पुरुषी' गोटात ओढलं जातं आणि मग 'पुरुषत्वा'विना उद्धार नाही.. पुरुषत्वचं श्रेष्ठ हे बिंबवलं जातं. म्हणूनच बायकी वागणाऱ्या पुरुषांनाही हेटाळणी सहन करावी लागते आणि पुरुषी वागली की स्त्रीला विशेष किंमत दिली जाते. स्त्रित्व आणि पुरुषत्व यांच्यात  सामाजिक समता येत नाही, तोवर खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समता साधली जाणार नाही. ही 'त्व' समता लवकरच साधली जावो, याच महिला दिनी शुभेच्छा!!
- संकेत सातोपे
--------------
http://m.lokmat.com/sakhi/womens-day-2018-story-anandibai-joshi-and-rakhmabai-raut/

सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

शाकाहाराचा माज कशाला?

शाकाहारी असणं हे आपल्याकडे विनाकारणच आध्यात्मिकता, प्रासादिकता, शुद्धता, सात्विकता, वगैरेशी जोडलं गेलं आहे. वास्तविक वांग्याचं भरीत आवडतं म्हणून एखादा ते खातो आणि एखाद्याला आवडत नाही म्हणून तो खात नाही; इतकाच शाकाहारी - मांसाहारी हा विषय सोपा आणि सुटसुटीत असायला हवा. पण त्याभोवती अवघ्या अध्यात्माची गुंफण केली गेल्यामुळे अनेक शाकाहारींना आपण जरा विशेष सात्विक असल्याचा भास होत असतो आणि त्यांच्यासाठी मांसाहार हा ‘शीsss’ असतो. या ‘शीsss’ची शिटावळ त्यांच्या डोक्यातून धुऊन काढण्यासाठीच इथे चार गोष्टी लिहाव्याशा वाटतात.
           मुळात निव्वळ मांसाहारी असा माणूस या जगाच्या पाठीवर अस्तित्वाच नाही. माणूस एकतर शाकाहारी असतो किंवा ‘मिश्र आहारी’. मांसाहारींच्या जेवणातही कोंबडीच्या रश्श्यासोबत पोळी, भातच असतो. मात्र माणूस हा मूलत: शाकाहारी प्राणी आहे आणि त्याने मांसाहार करणे, हे अनैसर्गिक आहे, असा गैरसमज हेतुपुरस्सर शाकाहाराच्या भोक्त्यांकडून पसरविला जातो. त्यांना हे ठासून सांगावस वाटतं, बाबांनो! आदिम काळापासून माणूस हा प्राणी मिश्र आहारीच होता. भटक्या अवस्थेत जगताना, शिकारीतून मिळणारं मांस आणि कंदमुळं हेच त्याचं प्रमुख खाद्य होतं. आजही माणसाचा पूर्वज मानला गेलेला वानर हा प्राणी किडेही खातो आणि झाडपालाही. माणसाबरोबर सहस्रावधी वर्षांपासून राहणारे कुत्रा, मांजर आदी प्राणीसुद्धा असेच मिश्रआहारी आहेत. आज उत्क्रांत होऊन सहस्रावधी वर्षं लोटल्यानंतरही माणसाचे पुढचे काही दात हे दाढेच्या दातांपेक्षा वेगळे आणि मोठे- टोकदार असतात, गाई-म्हशींसारखे एकसारखे नसतात. हाही माणसाच्या नैसर्गदत्त मिश्र आहारी असण्याचा पुरावाच आहे. याच मंडळींकडून असंही पसरविलं जातं की, आयुर्वेदामध्ये मांसाहार निषिद्ध मानला गेला आहे. हाही धादंता खोटा आणि दिशाभूल करणारा प्रचार आहे. उलट आयुर्वेदाने अनेक आजारांमध्ये मांसाहारामुळे होणारे लाभ अधोरेखित केले आहेत, हे मला आयुर्वेदात एमडी करणाऱ्या माझ्या एक मैत्रिणीने सांगितलं. प्राचीन हिंदू संस्कृतीमध्येही मांसाहार निषिद्ध मानला गेलेला नाही. उलट देवासमोर विविध पशुपक्ष्यांचे बळी देऊन त्यांचे मांस प्रसाद स्वरूप वाटण्याचे प्रकार आजही आपण अनेक मंदिरांमध्ये पाहातो.
           मला एका गोष्टीचं कायमच आश्चर्य वाटत आलं आहे की, राम नवमीला मांसाहार नको, कृष्णाच्या देवळात मांसाहार करून जाऊ नका, असं सोवळं पांघरणारे किंवा मांसाहार करणाऱ्यांबाबत मनात किंतु बाळगणारे लोकं मुळात प्रभू श्रीरामच शाकाहारी नव्हते, हे का लक्षात घेत नाहीत. वाल्मिकी रामायणात वालीवधाच्या वेळी प्रत्यक्ष श्रीरामांनी शिकारीचं समर्थन केलं आहे, वालीची शाखामृग अशी संभावना केली आहे. राम हरीण मारायला गेले असतानाच सीतेचं अपहरण झालं, याकडेही सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं.
           शाकाहारामुळे बुद्धी शांत राहते, बौद्धिक क्षमता वाढते, सात्विकता येते, हा आणखी एक अपसमज. अहो ज्यांनी जीवावर बेतले असतानाही शांतीचीच शिकवण दिली आणि त्यानुसार आचरण केलं, ते जगभरात शांतीदूत मानले गेलेले येशु ख्रिस्त आणि भगवान गौतम बुद्ध हे दोन्ही महापुरुष शाकाहारी नव्हते. बुद्धांचे महापरिनिर्वाण तर डुकराच्या शिळ्या मांसातून विषबाधेने झाल्याचं मानलं जातं. त्याउलट लाखो लोकांचा नृशंस संहार करणारा क्रूरकर्मा हिटलर हा शाकाहारी होता. त्याचं प्राणीप्रेम इतकं पराकोटीचं होतं की, पशुअत्याचार प्रतिबंधक कायदा जगाच्या इतिहासात पहिल्यांदा हिटलरने केला. जगभरात हिंदू तत्त्वज्ञानाचा प्रचार करणारे आधुनिक तपस्वी आणि ज्यांच्या अजोड बौद्धिक क्षमतेचं कायम उदाहरण दिलं जातं ते स्वामी विवेकानंदही अजिबात शाकाहारी नव्हते. तारुण्याच्या काळात तर ते नाश्त्याला दोन-दोन, चार-चार बोकडांच्या मुंड्या फस्त करीत असत.
           मेलेल्या प्राण्यांचे मांस खाऊन पोटाची दफनभूमी करू नका, अशा पाट्या वाचण्यात येतात, तेव्हा विचारावस वाटतं की, तुम्ही शाकाहार करता म्हणजे काय पोटाची कचराकुंडी करता की काय? कारण मेलेले प्राणी पुरून किंवा जाळून टाकतात, तसा छाटलेला झाडपाला कचरापेटीत किंवा उकीरड्यावर टाकण्यात येतो. कोणतीही गोष्ट ही सापेक्ष असते आणि आपण त्याकडे कोणत्या दृष्टीने पाहातो, यावरच त्याचं मूल्यमापन होतं. आता हेच बघा ना, ताटात वाढलेलं अन्न हे पूर्णब्रह्म, म्हणून आपण त्याला वंदन करत असतो. पण तेच ताटाबाहेर सांडताक्षणी खरकटं ठरवून त्याज्य मानतो. हा साधा साक्षेप, या अतिरेकी शाकाहारवाद्यांकडे नसतो, याचंच आश्चर्य वाटतं.
           मध्यंतरी एक पोस्ट समाजमाध्यमांवर फिरत होती. म्हणे, मांस-मच्छीला स्वत:ची चव अशी नसतेच; त्यात पडणाऱ्या मसाल्यांमुळे काय ती त्यांना चव येते, बाकी सर्व प्रकारचे मांस काय, मासे काय सारखेच. साहाजिकच या पोस्टचा कर्ता अतिरेकी शाकाहारवादीच असला पाहिजे. कारण ज्याला मांसाहाराची चव माहिती आहे, तो असली बालिश विधानं कधीच करणार नाही. या महाभागांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की, सगळ्या मांस-मासळीची चव जर सारखीच असते, तर त्यांच्या किमतीत इतका फरक का? मांदेली-बोंबलाचा वाटा १०० रुपये आणि पापलेटची जोडी हजार रुपये असे का? बॉयलर कोंबडी १५०-२०० रुपये किलो आणि बोकडाचे मांस ५०० रुपये हा भेद का? हे मांस विकणारे चापलूस आहेत की विकत घेणारे खवय्ये मूर्ख आहेत. तव्यावर परतण्यात येणाऱ्या माशांच्या वासावरून जिथे अस्सल खवय्याला ते सुके बोंबील आहेत, बांगडा आहे की रावस –पापलेट हे ओळखता येतं किंवा मटणाच्या रश्श्यावर सुटणाऱ्या तेलाच्या तवंगावरून ते कोवळ्या बोकडाचं आहे, बॉयलर कोंबडीच आहे की गावठीचं हे कळतं; तिथे सगळ्या मांसाहाराची चव सारखीच असते हे मांसाहार न करताच ठोकून देणाऱ्या या महाभागांच काय करायचं! मांस आणि विशेषत: माशांना दुर्गंध येतो, म्हणून ते ‘शीsss’ आहेत. असं म्हणणाऱ्यांना सांगवस वाटतो, ताज्या माशांना दुर्गंध येत नाही, तर उग्र वास येतो. पण शेपूच्या भाजीचा वास काय कमी उग्र असतो? जेवणात वापरता तो हिंग काय उग्र नसतो? आणि मासे खराब झाल्यावर दुर्गंध येतो म्हणाल, तर तो टवटवीत असताना सुगंधी असणाऱ्या फुलांनाही येतो. पटत नसेल, तर बाजार उठल्यावर दादरच्या फुल मार्केटमधून फेरफटका मारून बघा. कोणता दुर्गंध सुसह्य, कोणता असह्य हे आपल्या सवयी किंवा सोयीवरून ठरत असतं.
           मांसाहारामुळे हिंसा होते, असा ओरडा करणारे झाडपाल्यालाही जीव असतो हे विसतात की काय? आणि शेतात अनेक प्रकारचे जीवजंतू, प्राणी हे कीटकनाशकं आणि कृमीनाशकं फवारून मारण्यात येतात. त्यानंतरच आपल्याला हवा असणारा भाजीपाला उपलब्ध होत असतो. अनेक झाडांच्या मुळात खराब झालेले मांस-मासे खत म्हणून पुरले जातात. शिवाय आपण घेत असलेल्या विविध प्रकारच्या औषधांवर ती शाकाहारी असल्याचे (खाद्यपदार्थांच्या पाकिटांप्रमाणे) नमूद करण्यात येत नाही. आताआता कुठे सौंर्द्यप्रसाधनांवर ते नमूद करण्यात येऊ लागलं आहे. यकृतासंबंधी बहुतांश औषधांमध्ये माशाचं तेल हटकून वापरण्यात येतं. अन्य कोणत्याही जिवाची कोणतीही हानी न करता, आजवर कुणालाही जगता आलेलं नाही. त्यामुळे आपल्याला खाद्य मिळविण्यासाठी अन्य कुणाचा तरी बळी घेणं हा माणसाचाच नव्हे, तर सर्वच सजीवांचा स्वभाव आहे. असे बळी न घेता आपण कसं जगलो, हे भासवून सात्विकता मिरवणारे बऱ्याचदा दांभिक असतात.
           हा सगळा लेखन प्रपंच शाकाहारी असणाऱ्यांच्या मनात मांसाहाराबाबत आकर्षण निर्माण करण्यासाठी किंवा मांसाहाराचा प्रचार- प्रसार करण्यासाठी मुळीच नाही. मुळात शाकाहाराचा प्रचार करणाऱ्या संस्था-संघटना आहेत, पंथोपंथ आहेत. तशा मांसाहाराच्या प्रचारासाठी असल्याचे माझ्या ऐकीवात नाही. तशा संस्था नाहीत, यातच मांसाहाराचे स्वाभाविकपण किंवा निसर्गसंमतता आहे. ज्या गोष्टी नैसर्गिक नसतातच, त्याच अशा प्रयत्नपूर्वक आणि पुन्हा पुन्हा कराव्या लागतात. जसे की संस्कार; निसर्गत: प्राणी म्हणून जन्मणाऱ्या भय-भूक-निद्रा-मैथुन यांना बांधलेला असलेल्या माणसाला समाज धारणेच्या गरजेसाठी संस्कारी केलं जातं. आणि मग मला कसं वागायचयं यापेक्षा कसं वागलं पाहिजे याचा विचार करूनच तो आयुष्याच्या अखेरपर्यंत जगतो. हे ज्याला जितकं जास्त जमतं, तितका तो अधिक ‘चांगला माणूस’ ठरतो आणि ज्याला जमत नाही, तो दुराचारी! समाजधारणेसाठी अत्यावश्यक त्या ठिकाणी उपजत प्रेरणांना मुरड घालायलाच हवी, कारण त्याबदल्यात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मूलभूत गरजा भागविल्या जाण्याची हमी समाजव्यवस्थेकडून मिळते किंवा मिळाली पाहिजे. मात्र आधीच शेकडो प्रकारच्या भेदाभेदांनी ग्रासलेल्या भारतीय समाजात आणखी एका भेदाला कारणीभूत ठरणाऱ्या शाकाहारविरुद्ध मांसाहार या वादाला आपल्या नव्या पिढीने तरी मूठमाती दिली पाहिजे.
         धावत लोकल पकडल्यामुळे दम लागलेल्या एका मुलीला, माझ्या आईने पाणी दिलं, तर त्याही स्थितीत तिने, तुमच्या घरी नॉनव्हेज बनतं का, विचारलं आणि बनतं म्हटल्यावर पाणी घेणं नाकारलं. हा प्रसंग वरपांगी आम्हालाही हास्यास्पद वाटला, पण ही शुद्धाशुद्धतेची भावना जाऊन, मला मांसाहार आवडत नाही, म्हणून मला नको, असे म्हणणारी सामाजिक मानसिकता तयार व्हायला हवीच. त्यासाठीच मांसाहार हा ‘शीsss’ आहे, ही भावना आधी मांसाहारींनी सोडायला हवी. नेहमी मांसाहार करणारे देवाच्या नावे शाकाहार का करतात, हेच मला कळत नाही. मांसाहार पचायला जड असतो, म्हणून उपवासाला तो करत नाहीत, असा युक्तिवाद करणाऱ्यांना मला सांगावंसं वाटतं की, बासुंदी-पुरी या शुद्ध शाकाहारापेक्षाही बोंबलाचं सार आणि भात पचायला हलकं असतं रे. आणि पचायला जड असणारं अन्नच तामसी मानायला हवं. त्यात शाकाहारी किंवा मांसाहारी असा भेद कशाला!
           शाकाहार किंवा एकंदरीतच आहाराबाबतच्या अनाठायी दुराग्रहामुळे आपण आजवर अनेक महनीय व्यक्ती गमावून बसलो आहोत. पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी, प्रत्यक्ष डॉक्टरी करायला सुरुवात करण्यापूर्वीच ऐन तारुण्यात गेल्या. त्यामागे प्रमुख कारण होतं, ते अमेरिकेच्या वातावरणात आवश्यक तो आहार बदल न करण्याचा दुराग्रह. तीच कथा रामानुज यांच्यासारख्या थोर गणितज्ज्ञाची. अहो, निम्मी पेशवाई केवळ क्षयाने खोकून खोकून गारद झाली. शरीराला आवश्यक तितक्या प्रमाणात आहार न मिळणे किंवा खाल्लेले अंगाला न लागणे, ही क्षयाची कारणे आहेत, हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे ना. माझ्या एका मित्राचा मुलगा खेळून आल्यावर अचानक बेशुद्ध झाल्यासारखा पडला, त्याला गदागदा हलवून उठवावं लागलं. डॉक्टरने सांगितले की, याला किमान अंडी तरी खाऊ घालत जा. शरीराला आवश्यक तितकं त्याला शाकाहारी आहारातून मिळताच नाहीये. शेवटी शाकाहाराचा दुराग्रह बाजूला ठेवून त्याला अंड्याचा खुराक सुरू करण्यात आला.
       शाकाहार हे पूर्णांन नाहीये, असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण शरीराला आवश्यक उष्मांक, प्रथिनं आणि अन्य घटक मिळण्यासाठी योग्य ते आणि योग्य त्या प्रमाणात शाकाहारी पदार्थ आपण खातो किंवा खाऊ शकतो का, हा प्रश्न आहे. मोठ्यांना तुम्ही आग्रह करू शकाल, लहान मुलं पेलाभर दूधही तुमच्या सांगण्यावरून नियमित पितीलच असं नाही. त्याऐवजी अंड्याच ऑम्लेट ते आवडीने खाणार असतील, तर केवळ शाकाहाराच्या दुराग्रहापायी त्याला या अन्नापासून दूर ठेवायचं का, हाही विचार केला पाहिजे.
           शाकाहारी सगळेच पदार्थ चांगले आणि मांसाहारी वाईट, ही अंधश्रद्धा आहे. अफू, गांजा, तंबाखू, भांग हे काय मांसाहारी पदार्थ आहेत का? म्हटलं तर झाडपालाच ना हा सगळा? पण तो शरीरासाठी घातक म्हणून आपण त्याज्यच ठरवतो ना. एकंदरच खाद्य काय, अखाद्य काय, हे आपल्याला काय पचतं किंवा आपल्या जीवनशैलीनुसार आपल्या शरीराला काय आवश्यक, काय चवीचं, त्यानुसार ठरवलं पाहिजे. केवळ सोवळ्या – ओवळ्याच्या श्रद्धांपायी उत्तम चवी आणि दर्जेदार खाद्य दूर लोटण्यात काय हशील? किमान आपण अखाद्य ठरवलेल्या गोष्टी इतरांसाठी खाद्य असल्या, तर त्याबाबत घृणा बाळगण्याचं तरी काही कारण नाही.

© - संकेत सातोपे

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

ब्राह्मण आणि ब्राह्मण्य


कोकणातलं दोन - अडीच हजार लोकसंख्येच माझं इटुकलं गाव. गावात ब्राह्मणांची तशी बरीच घरं आहेत. पण शेजार- शेजारच्या दोन ब्राह्मण कुटुंबांच्या मानसिकतेतील भेद प्रातिनिधिक स्वरूपात मला इथे मांडायचा आहे. यातल्या कुणालाही झुकतं माप द्यायचं नाही किंवा कुणालाही योग्य- अयोग्यही ठरवायचं नाही. केवळ वस्तुस्थिती मांडायची आहे.


यातील एका कुटुंबात अद्यापही रीतसर सोवळं- ओवळ पाळलं जातं. कुठल्या जातीच्या लोकांनी घराच्या आवारात यावं, कुठल्या जातीच्या मंडळींनी ओसरीपर्यंत आलेलं चालेल. त्यापलीकडे आणि स्वयंपाक घरात तर ब्राह्मणेतरांनी आलेलंच चालणार नाही, असे कटाक्ष आहेत. घरी आलेल्या ब्राह्मणेतरांसाठी वेगळी भांडी आहेत किंवा त्यांना दिलेली भांडी गोमूत्र शिंपडून घेतली जातात. त्यांच्या मुलांना फार कुणात मिसळू दिले जात नाही. त्यांच्या त्यांच्यातच खेळायचं, बोलायचं असा अघोषित बहिष्कार त्यांनी स्वतःच स्वतःवर लादून घेतला आहे. अन्य कुणाकडे जाऊन बसणं, खाणं- पिणं यावरही त्यांनी स्वतःच बंधन लादून घेतली आहेत. घरातल्या कार्यक्रमांतही फक्त ‘त्यांची’ माणसं असतात.
या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून, हल्ली त्यांना कामासाठी माणसं मिळत नाहीत. बागेतली कामही कायम खोळंबलेली असतात. अडल्या गरजेला पटकन धावून येणारं कुणीच नाही, अशी धास्ती तेच त्यांच्या नातलगांना बोलून दाखवतात. त्यातही घरात एखाद्या वृद्धाला ठेवून कुठे जायचं तर त्यांना जोखिम वाटते.

दुसऱ्या कुटुंबाची स्थिती याच्या परस्परविरुद्ध आहे. त्यांची मुलं अखंड गावासोबत खेळत, टिवल्या- बावल्या, धम्माल-मस्ती, कधी मारामाऱ्या - कुटकुट्या करत मोठी झाली. त्यांच्या घरात- माजघरातच काय, स्वयंपाक घरातही वाट्टेल तो माणूस पातेल ढवळताना सापडेल. अंगणात म्हणजे कायम गप्पांचे फड रंगलेले. घरातले सगळे गावातल्या प्रत्येकाचे दादा- भाऊ- आत्या- ताई. गावात कुणाचं दुखणं- खूपणं असू दे की अन्य कोणताही कार्यक्रम घरातली सगळी मंडळी हिरीरीने पुढे. जात कशाशी खातात ते घरात माहीत नाही. याचा अर्थ घरात व्रतवैकल्य, देवा- धर्माच होतं नाही, असं मात्र नाही. पण सोवळं नेसून फिरणं नाही की जपमाळ- भस्म- गंधाचे सोपस्कार नाहीत. माणसं सोडा गुरांढोरांवर, कुत्र्या- मांजरावरही तितकंच प्रेम. परिस्थिती बेताचीच पण म्हणून पाळलेल्या जनावरांचे काय आबाळ होतील…
या घरच कुठलंही काम अडत नाही. त्यांनी सांगायच्या आत स्वतःहून राबायला तयार असणारे ५-५० हात कायम पुढे असतात. कित्येकदा तर मजुरीसुद्धा न घेता त्यांचं प्रत्येक काम केलं जातं. रात्री घरात कुणी फार खोकल तरी शेजारची चार माणसं स्वतःहून उठून चौकशीला जातात. कुणी आजारी असेल, तर रात्र-रात्र थांबतात.
‘यांची बरी सगळी कामं होतात. यांना बरे कामाला लोकं मिळतात,’ असे खोचक टोमणे या कुटुंबाला गावातल्या त्यांच्याच नातलगांकडून ऐकावे लागतात.

तळटीप :

या पोस्टचा उद्देश केवळ वस्तुस्थिती मांडणे हा आहे. यावर मला कोणतेही मत व्यक्त करायचे नाही. संदर्भ मूल्य असलेला हा प्रकार जसाच्या तसा लोकांपुढे ठेवायचा आहे. यातून प्रत्येक जण ज्याच्या- त्याच्या मानसिकता, पूर्वसंस्कार आणि विचारधारेनुसार लावायचा तो अर्थ लावेल. ब्राह्मणद्वेष्ट्यांना कदाचित हे ब्राह्मणांना झोडपण्यासाठी आयते कोलीत वाटेल. ब्राह्मण्यवाद्यांना ही कदाचित खुसपट वाटेल. आणखी कुणाला काय, तर कुणाला काय… ज्याला जे वाटायचे आहे, त्याला ते वाटण्याची पूर्ण मोकळीक राहावी, यासाठीच या वस्तुस्थितीच्या आधारे मला मतप्रदर्शन करायचे नाही किंवा कोणताही निष्कर्षही मांडायचा नाही.

  • संकेत सातोपे

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

असं प्रेम लोक का करतात!?

आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती सामान्यतः आपल्याला आवडतेच. किंवा कदाचित त्याचं ते प्रेम करणं आवडत असेल. असं म्हणतात की, जगातील कोणतीच भावना आणि पर्यायाने कोणतंच नातं एकतर्फी असत नाही; मग ते शत्रुत्व का असे ना! समोरच्याचा त्यात सक्रीय वा निष्क्रिय सहभाग असतोच असतो. प्रेमाबाबत आणखी एक गृहीतक आपल्या डोक्यात पक्कं बसलंय, ते म्हणजे आपली काळजी घेणाऱ्या किंवा आपली सरबराई करणाऱ्याच्या आपण प्रेमात असतो. पण एव्हढ्यात पाहण्यात आलेलं एक नाटक, एक चित्रपट आणि एक घटना, यांनी या सरधोपट गृहितकाचा पुनर्विचार करण्यास बाध्य केलं.
         त्या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम; दोघंही सुस्थित, लग्नही ठरल्यात जमा. एकदा आईस्क्रीम खायला म्हणून बाहेर गेले आणि रस्ता ओलांडताना अपघात झाला. आता ती पुन्हा उभी राहू शकणार नाही. तरीही हा रोज सकाळी तिच्या घरी जातो. तीच सगळं करतो आणि मग ऑफिस.. हे असं कित्येक वर्षं चाललंय. ठाणे- डोंबिवली परिसरातीलच ही घटना असल्याचं एका मैत्रिणीच्या तोंडून ऐकलं.
         दरम्यान ‘मी बीफोर यू’ हा चित्रपट पाहण्यात आला. लुईजा- एक वेंधळी मुलगी, जिला सांडल्याविना चहाचा पेलाही भरता येत नाही. अशात एका अब्जाधीशाकडे तिला नोकरीची संधी मिळते. वील हा साधारण तिशीतला तरुण, जो एका अपघाताने कायमचा अंथरुणाला खिळला आहे. त्याच्या मानेखालील शरीराच्या संवेदना नाहीशा झाल्या आहेत. त्याने स्वित्झर्लंडमध्ये इच्छा मरणासाठी अर्ज केला आहे आणि काही महिन्यांतच तो स्वतःला सन्मानाने संपविण्यासाठी युकेतून तिथे जाणार आहे. तोवर त्याची हरप्रकारे काळजी घ्यायची, त्याच्यासोबत बोलायचं, त्याच्या आयुष्यात इतका रस निर्माण करायचा की, त्याने इच्छामरणापासून परावृत्त व्हावे. हे काम त्या वीलच्या आई-वडिलांकडून या चुळबुळ्या- गोंडस लुईजाला देण्यात आलं आहे. जे ती पार पाडू शकेल याची शाश्वती अन्य कुणाला सोडा, खुद्द तिलाही नाहीये. पण ती काम सुरू करते आणि अवखळ- अल्लड मुलीचे रूपांतर एका धीरगंभीर स्त्रीमध्ये होतं. कालपर्यंत तिची काळजी घ्यावी लागत होती, आज ती एका उठूही न शकणाऱ्या रुग्णाचा सांभाळ समर्थपणे करते. पुढे तिची काळजी घेणाऱ्या प्रियकराला दूर करून ती या अपंगाच्या प्रेमात पडते. पण त्याची संपत्ती, पैसा नाकारते.
        सध्या रंगभूमीवर गाजणारं ‘अनन्या’ हे नाटकही काहीसं याचं धाटणीचं. अपघातात हात गमावल्या अनन्याशी संसार करायला तयार झालेला जय.. अनन्याच्या प्रेमात पडलेला असाच मोकळा -ढाकळा, काहीसा बेफिकीर मुलगा.
       या तिन्ही गोष्टींमध्ये प्रेमात पडणाऱ्यांनी समोरच्या व्यक्तीची मोठ्ठी जबाबदारी आपसूक स्वीकारली आहे. किंवा या जबाबदारीमुळेच ते समोरच्याच्या प्रेमात पडले आहेत. म्हणजे आपली काळजी घेणारा नव्हे, तर आपल्याला जो त्याची काळजी घेऊ देणार आहे; त्याच्या प्रेमात या व्यक्ती आकंठ बुडाल्या आहेत. आणि समोरच्याने स्वतःची काळजी घेऊ दिल्याबाबत, त्याच्याप्रति कृतज्ञ आहेत. बरं, हे सगळं त्यांनी केवळ एक कर्तव्य या भावनेतून केलं असतं, तर त्यातली सगळी उत्स्फूर्तताच निघून गेली असती. त्यात नित्योपचाराचा रुक्षपणा आला असता. प्रेम भावनेसाठी लागणारा रसरशीतपणाही नष्ट झाला असता. महत्त्वाचं म्हणजे या व्यक्तींना यातून काही सामाजिक मोठेपण मिळणार आहे किंवा त्यांच्यावर ही जबाबदारी कुणी लादली आहे, असंही नाही. मग काय आधार असतो या प्रेमाला?
याचं उत्तर स्वामी विवेकानंदांच्या एका वाक्यात सापडतं, ‘दानाने याचक नव्हे, तर दाता उपकृत होतं असतो.’ याचकासाठी दानाच मोल त्या वस्तुपुरतचं, पण दात्याला मात्र दानाची भावना खूप काही देऊन जाते. घेण्यात नव्हे, तर देण्यात खरी मजा आहे, हे आपण लहानपणापासून ऐकतो, त्याच कारण हेच.
        लहान बाळाचे किती लाड करतो आपण! ते बाळ क्षणात विसरूनही जातं; पण आपल्याला मात्र त्याचे केलेले लाड आणि त्यातून मिळालेला आनंद कायम लक्षात राहतो. हेच याबाबतीत होत असेल ना! कशा-कश्याचाही विचार न करता एखाद्यावर जीव तोडून प्रेम करणं, ही मनाला एक वेगळीच उंची गाठून देणारी भावना आहे. तसं प्रेम ज्याला जमलं, तो भौतिक- व्यवहार्य सुखाच्या विचारांतून त्याच्याही नकळत मुक्त होतो. देव या संकल्पनेवर निरतिशय प्रेम करणं, हीसुद्धा अशीच उन्नत करणारी भावना आहे. ते जमलं, तो खरा भाग्यवंत.. म्हणूनच तुकोबा म्हणतात ना की, ‘बहुत सुकृतांची जोडी म्हणूनि विठ्ठल आवडी.’
          याचं आणखी एक अंग म्हणजे, माझी आणि फक्त माझीच एखाद्याला अत्यंत गरज आहे, ही मानवी जीवनातील सर्वांत सुखावह आणि माझी कुणालाच गरज नाही, ही सर्वांत दुःखद भावना आहे. मुलं-बाळं त्यांच्या संसारात रमली की, म्हातारी माणसं एकटी पडतात, निराश होतात. त्याचं प्रमुख कारण,  माझी आता कुणालाच आवश्यकता नाही, या भावनेतच आहे. एक वेळ माझी कुणालाच फिकीर नाही, या भावनेसह माणूस जगू शकेल, पण मी फिकीर करावी, असं कुणीच नसताना आयुष्य ढकलणं कर्मकठीण…
     प्रत्येकाला जगण्यासाठी एक अशी जबाबदारी लागतेच, जिच्यासाठी तो जीव ओवाळून टाकील. ती जर प्रेमापोटी, स्वेच्छेने स्वीकारण्याची संधी मिळाली, तर त्यासारखं सुख नाही. ही प्रेमळ जबाबदारीच माणसाला समंजस बनवते आणि वाट्टेल ते धाडस करायला सिद्ध करते. प्रचंड मस्तीखोर मुल त्याच्यापेक्षा लहान मुलांसोबत खेळताना जबाबदारीने वागतं. युद्धच्या वेळी देशाला आपली गरज आहे म्हटल्यावर बहुतांश नागरिक जबाबदारीने वागतात. वाट्टेल तो त्याग करायला, प्रसंगी जीव द्यायला तयार होतात. पण तेच शांततेच्या काळात खुशाल अप्पलपोटे होतात.
         आपल्यावर कुणीतरी प्रेम करणं आपल्याला आवडतं;  त्यापेक्षा आपलं प्रेम करणं कुणालातरी आवडतंय, खुलवतयं या संवेदना अधिक आनंददायी आहेत. अगदी रतीसुखातसुद्धा स्त्रिला पूर्ण तृप्त करू शकण्यात पुरुषाला धन्यता- पुरुषार्थ वाटतो आणि ते तो करू शकला नाही, तर अतृप्तीही जाणवते, असं म्हणतात. एकंदरीत काय कुणाच्यातरी आयुष्यात आपल्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याविना त्याचं पानही हलणार नाहीये, ही जगातली सगळ्यात गोड भावना आहे. ती मिळवण्यासाठी कुणी पैसे मोजतं, तर कुणी आयुष्य!

  • संकेत सातोपे
--------------


http://www.lokmat.com/relationship/love-beyond-words-these-three-stories-will-give-new-vision-life/

सोमवार, २३ जुलै, २०१८

जातीयवादाची व्यंकटी सांडो!

कोणत्याही कारणाने का असेना, पंढरीत शासकीय पूजेपासून आज एका ब्राह्मणाला रोखले; याबद्दल अनेक ज्येष्ठ पुरोगामी मंडळींना आनंदाच्या उकळ्या फुटतायत. काहीशे वर्षांपूर्वी अशाच जातिभेदामुळे संत चोखामेळा यांना मंदिराच्या पायरीशी रोखून धरणाऱ्या सनातनी मानसिकतेत आणि या कथित पुरोगामी मानसिकतेत एक प्रकारचे किळसवाणे साम्य आहे. जातीअंत म्हणजे कुठूनही फक्त ब्राह्मणांना चोपणे का? जातीभेद काय फक्त ब्राह्मणच पाळतात? राजकारण, सत्ताकारण यापासून त्यांना दूर ठेवल की, जातीअंत साधेल का? हे प्रश्नही आपण स्वतः विचारलाय हवेत ना?

इथे आणखीन एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे, ब्राह्मणेतरांमध्येही जातीचा अहंकार आणि मग्रुरी आहे, म्हणजे ब्राह्मणांमध्ये नाहीच असंही नाही. म्हणूनच काल देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या काही पोस्ट फिरत होत्या, त्यात ब्राह्मण मुख्यमंत्र्याबाबतचा टेम्भा मिरवण्यात येत होता. विशिष्ट जातीचा मुख्यमंत्री पूजा करू शकला नाही याबाबत आनंद मानणारे कथित पुरोगामी आणि आपल्या जातीचा माणूस मुख्यमंत्री होऊ शकला या खुशीत गाजर खाणारे, या दोन्ही मानसिकता एकाच जातीयवादी ओंगळ नाण्याच्या दोन गलिच्छ बाजू आहेत.

ब्राह्मणत्व, मराठत्व, दलितत्व ही सगळी ‘त्व’ एका समाजत्वात विरघळून जावो… शिवछत्रपतींचा खराखुरा पुरोगामी आणि जातिरहित महाराष्ट्र पुन्हा घडो... आडनावातून ‘आपला माणूस’ शोधणाऱ्या खळांची व्यंकटी सांडो… आणि परस्परा जीवाचे मैत्र जडो… हीच त्या सर्वव्यापी पांडुरंगा चरणी मनःपूर्वक प्रार्थना...🙏🙏🙏
             
                                                            -संकेत सातोपे

शनिवार, ३१ मार्च, २०१८

विस्मृतीच्या गर्तेतील आद्य महिला नाटककार!
प्रसिद्धी पटलावर येणाऱ्या कलाकारांची आपल्याला ओळख असते. त्यांच्या कलाकृती, त्यांची नावं आपण चिरकाल लक्षात ठेवत असतो. पण असे अनेक अज्ञात प्रतिभावंत आपल्या आजूबाजूलाच होऊन गेले आहेत, ज्यांची आपल्याला तोंडओळखही नाही. नियतीने त्यांचे काम आपल्यापर्यंत पोहोचू दिलेले नाही, याची जाणीव शिल्पा सुर्वे Shilpa Surve लिखित आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर यांचे चरित्र वाचताना होते.
लेखिकेने संदर्भ- पुराव्यांसह केलेली मांडणी पाहता, हे पुस्तक phd चा शोधनिबंध म्हणूनही सादर होऊ शकले असते, असे वाटते. पण केवळ इतिहास लेखनापेक्षा ललित शैलीतून विषय पोहोचवल्यामुळे तो अधिक भावतो. लक्षात राहतो.
चरित्र लेखन आणि त्यातही कलावंतिणीचे चरित्र लेखन करताना तिचे चारित्र्य सांभाळणे हे लेखकापुढे मोठे आव्हान असते. सत्यकथन करताना, चरित्र नायिकेच्या आयुष्यातील समाजमान्य नसणाऱ्या गोष्टींमुळेही तिचे चारित्र्य डागाळू नये, याची खबरदारी घ्यावी लागते; अन्यथा वाचकाच्या मनात नकारात्मक प्रतिमा उभी राहू शकते. हे टाळण्यासाठी समाजमान्य नसणाऱ्या गोष्टीही एखाद्याकडून का केल्या जातात, याची कारणमीमांसा करण्याची जबाबदारी चरित्र लेखकाची असते. ती शिल्पा सुर्वेंनी समर्थपणे पेलली आहे.
ओघवत्या, नाट्यमय लेखन शैलीमुळे संगीत नाटकांचा सुवर्णकाळ, तत्कालीन मुंबईतील चाळी, शाळा, सामाजिक मानसिकता, आदी गोष्टी चित्रमयरित्या वाचकापुढे उभ्या राहतात. हिराच्या आयुष्यात आलेल्या माणसांचे लेखिकेने केलेले चित्रण माणसा- माणसातील विरोधाभासांचे यथार्थ दर्शन घडवते.
एकंदरीत, सर्वसामान्य माणसातील प्रतिभावंत आणि प्रतिभावंतांतील सुमार माणसं या दोन्हीचे ओळख हिराचे हे नाट्यमय चरित्र वाचताना होते. एका अज्ञात प्रतिभावंताची ओळख करून दिल्याबद्दल लेखिकेचे आभार!
- संकेत सातोपे
'चॅलेंज' यथातथाच!
स्वा. सावरकरांच्या जीवनावरील नाटक पाहायला जाताना; काळजाला भिडणारे पल्लेदार संवाद, तेजस्वी व्यक्तिरेखा, देशप्रेमाने भारावलेला काळ, यांचे एक जाज्वल्य रसायन रंगमंचावर मूर्तीवंत साकार होणार आहे, अशा अपेक्षा घेऊनच प्रेक्षक जमलेले असतात. मात्र या अपेक्षा निम्म्यानेही पूर्ण करण्यात मुक्ता बर्वे आणि दिनेश पेडणेकर यांची संयुक्त निर्मिती असलेले 'चॅलेंज' हे नवे नाटक यशस्वी ठरले आहे, असे म्हणता येणार नाही. स्वतः नाटककार आणि शब्दप्रभू असलेल्या तात्यारावांना लेखणीतून साकारण्याचे शिवधनुष्य या नाटकाचा लेखक, दिग्दर्शक, वेशभूषकार आणि अभिनेताही असलेल्या दिग्पाल लांजेकर यांना तितकेसे पेललेले नाही.
नाटकात उभा करण्यात आलेला काळ हा सावरकरांच्या लंडन येथील विद्यार्थी दशेतला आहे. मूळात हा सावरकरांच्या आयुष्यातील सर्वांत झंझावाती काळ होता. रसरसत्या तारुण्यातील सावरकर लंडनमध्ये एकाच वेळी लेखणीचे शस्त्र आणि शस्त्राची लेखणी करून भारतीय सशस्त्रक्रांतीचा लढा नेटाने पुढे रेटत होते. महाविद्यालयीन अभ्यास, क्रांतीची सिद्धता, जनसंपर्क, १८५७चे स्वातंत्र्यसमरसारख्या ऐतिहासिक ग्रंथासाठीचे संशोधन, त्यात भारत भवनाची जबाबदारी अशा अनेक आघाड्या एकाच वेळी सांभाळणाऱ्या तात्यारावांची धीरोदात्तता आणि संयमीपण निखिल राऊत या कलाकाराने रंगमंचावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो केवळ प्रयत्नच असल्याची जाणीव संपूर्ण प्रयोगभर होत राहाते. मदन आणि अन्य सवंगड्यांमधील वाद क्षमवण्यासाठी मध्येच आवाज चढवणार आणि दर 8-10 वाक्यांनी सहकाऱ्यांचे खांदे दणादणा थोपटणारा सावरकरांच्या भूमिकेतील निखिल अगदी केविलवाणा वाटतो.
सावरकरांची हिंदवी स्वातंत्र्य लढ्याकडे आणि स्वतंत्र हिंदुस्थानच्या भविष्याकडे पाहण्याची स्वतःची अशी एक सुस्पष्ट भूमिका होती. ती त्यांच्या काही वाक्यांच्या विस्कळीत मांडणीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविता येणे अशक्य आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सावरकरांनी घेतलेली भूमिका नेमकी काय होती, हेच प्रेक्षकांपर्यंत पोचत नाही. मदनला प्रेयसीसह एका खोलीत पकडल्यानंतर सावरकर त्याच्यावर रागावतात, त्याला समज देण्याचा प्रयत्न करतात. मात्र मध्येच मदन त्यांना आपले वर्तन योग्यच असल्याचे ठासून सांगतो आणि तेथून विषय भरकटू थेट सावरकरांच्या मुलावर जातो. हे असे अनेक प्रसंग नाटकात आहेत, जिथे आत्ता सावरकर काहीतरी मौलिक सांगतील आहे वाटत असेपर्यंत विषय भलतीकडेच निघून जातो.
आ सिंधु-सिंधु पर्यन्ता, यस्य भारत भूमिका।
पितृभू-पुण्यभू भुश्चेव सा वै हिंदू रीती स्मृता।।
ही सावरकरांनी केलेली हिंदुत्वाची व्याख्या आहे, बंधुत्वाची नव्हे, पण लेखकाला ती कुठून तरी लोकांना सांगायची आहे. त्यामुळे ती एका ठिकाणी घुसडून टाकण्यात आली आहे. मूळात ही व्याख्या तात्यारावांनी लंडनमध्ये नव्हे, तर तुरुंगवासाच्या (रत्नागिरी) काळात हिंदुत्व ग्रंथ लिहिताना केली होती. त्यामुळे इथे ऐतिहासिक संदर्भही चुकला आहे.
स्टोव्हवरील कढते रसायन खाली उतरविण्यासाठी सांडशी नसणे, त्यामुळे स्फोटाच्या भीतीने अन्य सहकाऱ्यांनी पळून जाणे आणि सावरकरांच्या आधी मदनने पुढे होऊन हात पोळून घेणे, हे प्रकारही कमालीचे बालिश वाटतात. सांडशी नसताना पदर किंवा रुमालाने घरगृहिणीही चुलीवरचा तवा उचलते, हा सोपा पर्याय तात्यारावांना माहीत नसावा? असाच बालिश प्रसंग फितुराला पकडण्यासाठी खिडकीतून उडी मारण्याचाही वाटतो.
सपक लिखाण- दिग्दर्शन, सुमार पार्श्वसंगीत, निखिल राऊत यांनी ओढाताण करून वटवलेला (की वठवलेला, कोण जाणे) सावरकर, आदी गोष्टींमुळे हे नाटक प्रेक्षकांना सावरकरानुभूतीच्या उंचीवर नेण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. हुतात्मा मदनलाल धिंग्रा यांनी मृत्यूपूर्वी नियतीला केलेले 'चॅलेंज' हे रंगभूमीवर यथातथाच पेलले गेले आहे.
- संकेत सातोपे

शुक्रवार, ३० मार्च, २०१८

भाषाशुद्धीबाबत सावरकरांची भूमिका नेमकी काय?



मुंबई : क्रांतिकारक सावरकर, हिंदुहृदयसम्राट सावरकर, महाकवी सावरकर, नाटककार सावरकर, राजकारणी सावरकर ते गांधीवादाचे विरोधक सावरकर अशा स्वा. सावरकरांच्या अनेक पैलुंवर आजवर विपुल लिहिले- बोलले गेले; मात्र अस्पृश्यता-जातीभेद निवारक सावरकर आणि भाषा- लिपीशुद्धीचे पुरस्कर्ते सावरकर या त्यांच्या सोनेरी पैलूंकडे त्यांच्या समर्थक नि विरोधकांचेही काहीसे दुर्लक्ष झाले. यातील भाषाशुद्धीबाबतच्या त्यांच्या भूमिकेची आपण आजच्या संदर्भाने माहिती घेऊ या.

भाषाशुद्धी हा शब्द उच्चारणाऱ्यावर, अनेक कथित विद्वान तुटून पडतात. त्यांची काही पठडीतली वाक्य असतात; ती म्हणजे ‘भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते; ती प्रमाण किंवा बोली असते. पुणेरी म्हणजेच शुद्ध मराठी का? आनी- पानी, सकाली-संद्याकालीला अशुद्ध ठरवणारे तुम्ही कोण?’ खरंतर हा युक्तीवाद अगदीच योग्य आहे. केवळ मूठभर कथित उच्चवर्गीयांची मूळमूळीत भाषा म्हणजेच मराठी नव्हे. मात्र त्याच वेळी हेही लक्षात घेतले पाहिजे की, भाषाशुद्धी चळवळीत प्रमाण भाषाविरुद्ध, बोलीभाषा असा वाद अपेक्षितच नाही. तिथे वाद आहे तो स्वकीय भाषा की परकीय भाषा इतकाच. म्हणूनच या चळवळीतील मंडळींनी बोलीभाषेतील अनेक शब्द, वाक्प्रचार, अव्यय त्यांच्या प्रमाण भाषेतील लिखाणात वापरले. उदाहरणच द्यायचे झाले, तर स्वा. सावरकरांनी वापरलेल्या ‘नि’ या अव्ययाचे देता येईल. ‘आणि’ या अर्थाच्या ‘व’ या एकाक्षरी अव्ययाला पर्याय म्हणून सावरकरांनी हेतुपुरस्सर दीर्घ ‘नी’ त्यांच्या लिखाणात आणला. ‘तू नी मी संग्ती- संग्ती जाऊ’ अशा प्रकारे ग्राम्य बोलीत तो त्यापूर्वी वापरला जात होता. सावरकरांपाठोपाठ भाषाशुद्धीवादी ज्येष्ठ कवी माधव ज्युलियन यांनी लघु- गुरू आणि मात्रांच्या हिशेबातही ‘नी’ हा ‘व’ला चपखल पर्याय ठरावा, यासाठी एकाक्षरी शब्द दीर्घ लिहावेत, या मराठी शुद्धलेखनाच्या नियमाला फाटा देत ऱ्हस्व ‘नि’ वापरण्यास सुरुवात केली. हा प्रचार इतका धडाकेबाज होता की, मराठी शुद्धलेखनात अपवाद म्हणून ऱ्हस्व ‘नि’ आजही विराजमान आहे. अगदी भाषाशुद्धीचे विरोधकही तो तसाच लिहितात.

सारखेत मीठ मिसळले, तांदळात खडे मिसळले की, भेसळ होते आणि जे भेसळयुक्त आहे ते अशुद्ध. त्यामुळे मराठी या अस्सल देशी भाषेत अरबी- फारसी, इंग्रजी अशा परदेशी शब्दांची झालेली सरमिसळ दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे ‘भाषाशुद्धी.’ मराठीच्या अन्य बोलींचा, इतकेच काय संस्कृत, पंजाबी, कानडी अशा कुठल्याही भारतीय भाषांना किंवा त्यातील शब्दांना- रचनांना विरोध करण्याचा या चळवळीचा मूळीच हेतु नव्हता. स्वदेशी शब्दांना शुद्धीवादी मंडळींनी आक्षेपही घेतलेला दिसत नाही. सावरकरांना भारताचे अस्सल देशी राष्ट्रीयत्व अपेक्षित होते, त्याच अनुषंगाने त्यांनी देशी धर्म, देशी भाषा, देशी संस्कार आणि जीवन पद्धतीचा आजन्म पुरस्कार केला. रत्नागिरी येथील स्थानबद्धतेच्या काळात त्यांना राजकारणात भाग घेण्यास बंदी होती, या काळात त्यांनी जातपात निवारण आणि भाषाशुद्धीवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत केलेले दिसते. त्यासाठी दै. केसरीतील लेख मालिकेतून त्यांनी भाषाशुद्धीबाबत त्यांची भूमिका मांडली आणि त्यावर घेण्यात आलेल्या आक्षेपांचा प्रतिवादही केला. विशेष म्हणजे स्वा. सावरकरांचे कोणतेही साहित्य शासनाने यापूर्वी प्रकाशित केलेले नव्हते; त्यांचे मराठी भाषेचे शुद्धीकरण हे एकमेव पुस्तक शासकीय मुद्रणालयाने काही दशकांपूर्वी मुद्रित- प्रकाशित केले. त्यामुळे कितीही मतभेद असले, तरी सावरकरांची भाषाशुद्धी ‘राजमान्य’ही झाली आहे, असे म्हणण्याला प्रत्यवाय (हरकत हा परका शब्द इथे जाणीवपूर्वक टाळतो) नाही.

‘जगातील कोणतीच भाषा शुद्ध नसते. जगभरातील शब्द घेत गेले, म्हणूनच इंग्रजी जागतिक भाषा झाली. अजूनही ते त्यांच्या शब्दकोशात नवनवीन शब्द खुशाल घेत असतात.’ ही आणखी एक बाब सातत्याने याबाबत मांडली जाते. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. इंग्रजांनी जगभर राज्य केले, ते जिथे जिथे गेले तिथे जेते म्हणून गेले. त्यामुळे तिथून आणलेल्या वस्तू काय किंवा शब्द काय त्यांच्यासाठी भूषणावहच ठरणार. जसे १९७१च्या युद्धात आपण पाकिस्तानात घुसून उद्ध्वस्त केलेले त्यांचे ‘पॅटर्न रणगाडे’ आपल्या पराक्रम आणि अभिमानाची चिन्ह म्हणून अनेक ठिकाणी प्रदर्शनात मांडले आहेत. पण तेच मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यानंतर ‘ताज’ला पडलेली भगदाडे तातडीने बुजवून हॉटेल लवकरात लवकर सुरू करण्यात आणि मागे काही झालेच नव्हते अशा आवेशात उभे राहण्यात आपण धन्यता मानतो, यालाच ‘मुंबई स्पीरिट’ही म्हणतो. त्याचप्रमाणे भारतीय भाषांवरील अरबी, फारशी, इंग्रजीचा प्रचंड प्रभाव, या परकीय आक्रमकांनी केलेल्या आपल्या राष्ट्रीय जखमा आहेत आणि त्यांचे व्रण स्वकीय शब्दांनी भरून काढावेत. याकामी अन्य भारतीय भाषा आणि संस्कृतसारखी प्रचंड प्रसव क्षमता असलेल्या भाषेचाही आधार घेता येईल, अशी सावरकरांची भूमिका होती. हीच भूमिका हिंदवी स्वराज्य संस्थापनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली होती. त्याचसाठी त्यांनी तत्कालीन मुघली दरबारी रितींना फाटा देत, अस्सल भारतीय शिष्टचार आणले. त्यांनी किल्ले हा फारसी शब्द वगळून गड- दुर्ग असे शब्द वापरले. (उदा. रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, आदी). दरबाराला राजसभा म्हटले, वजीर, सरलष्कर आदी पदे घालवून पंतप्रधान, सुरनीस, सेनापती अशी नावे योजिली. राजमुद्रा, चलनसुद्धा संस्कृतमधूनच ठेवले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राज्यकारभारातून अरबी- फारशी शब्दांना पूर्णपणे सीमापार करण्यासाठी अष्टप्रधान मंडळातील रघुनाथ पंडितांकरवी संस्कृत प्रतिशब्द सुचविणाऱ्या ‘राज्यव्यवहार कोश’ या ग्रंथाची निर्मिती करविली.

भाषाशुद्धी चळवळीमुळे मराठी कमकुवत होईल आणि त्यात नव्या संकल्पना नि संज्ञांसाठीच्या शब्दांची वानवा होईल, असेही आक्षेप आहेत. प्रत्यक्षात या चळवळीने मराठीला शेकडो नवे शब्द दिले. हे नवे शब्द शासकीय प्रतिशब्दांप्रमाणे केवळ पुस्तकबंद राहिले नाहीत, तर ते सर्वसामान्यांच्या ओठी स्थिरावलेही. वानगीदाखल, महापौर, दिनांक, विधिमंडळ, विधानसभा, हुतात्मा, चित्रपट, दिग्दर्शक, बोलपट, न्यायालय, कार्यालय, नभोवाणी, दूरध्वनी, भूदल, नौदल, वायूदल असे अनेक शब्द सांगता येतील. केवळ शब्द देऊन सावरकर थांबले नाहीत. त्यांनी भाषाशुद्धीचा विचार मांडला. त्याची काही तत्त्वे निश्चित करून दिली. त्यामुळेच त्यांच्यानंतरच्या काळातही संगणक, भ्रमणध्वनीसारखे नवे शब्द पाडले आणि प्रचारले जात असताना आपल्याला दिसते. तंत्रज्ञानाच्या रेट्यासोबत येणारे परकीय शब्द, प्रतिशब्द सापडताच टाकून देऊन, प्रतिशब्दच प्रचारात आणल्यास ही चळवळ आजही पुढे रेटली जाऊ शकते. प्रतिशब्द पाडण्याच्या या हिरीरीमुळेच कोणत्याही भाषेची नवशब्द प्रसवक्षमता टिकून राहात असते, हे लक्षात ठेवायला हवे.

सावरकरांनी मांडलेला लिपीशुद्धीचा विचार हा प्रामुख्याने तत्कालीन मुद्रण व्यवस्थेच्या सोयीसाठी होता, असे दिसते. ‘सर्व, कृष्ण, क्रूर’ अशा अर्ध्या ‘र’च्या उच्चारासाठी एकच पद्धत योजावी. वेळेला संदर्भाने उच्चार ओळखावा लागला, तरी चालेल. तसेच अ, आ यांच्या पुढील स्वर अि अी अु अू अे अै असे लिहावेत, जेणेकरून जुळणीसाठी कमी खिळे लागतील आणि कामाचा वेग वाढू शकेल, असे सावरकरांचे म्हणणे होते. यात आणखीही काही मूळाक्षरांत बदल त्यांनी सूचविले होते. मात्र पुढे छपाई आणि टंकलेखनाच्या नवनव्या पद्धती विकसित झाल्याने या लिपीतील बदलांचा फारसा प्रसार होऊ शकला नाही.

आज सावरकरांनी सूचविलेले लिपीतील बदल किती आवश्यक, किती कालबाह्य यावर विद्वानांत चर्चा होऊ शकेल, मात्र मराठी भाषेतील काही उच्चारभिन्नता दाखविण्यासाठी देवनागरी-बाळबोध लिपीत काही सुधारणांची आवश्यकता आहे, हे बहुतांश लोक मान्य करतील. यात प्रामुख्याने ‘ज’ आणि ‘च’ यांच्या उच्चारणभिन्नता दाखविण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे दिसते. ‘जगतात’ हा शब्द ‘ज’चे मराठीतील दोन स्वतंत्र उच्चार दाखविण्याची सोय नसल्याने ‘जगात’ याअर्थाने आणि ‘जीवन जगतात’ या अर्थानेही वाचला जाऊ शकतो. म्हणूनच कुसुमाग्रज जेव्हा कोलंबसाचे गर्वगीत या कवितेत “कोट्यवधी जगतात जीवाणू जगती अन् मरती”, असे म्हणतात; तेव्हा ‘ज’चा नेमका कोणता उच्चार आणि अर्थ अपेक्षित आहे, हे आपल्याला सांगता येत नाही. बरं, हा शब्दांशी खेळण्यासाठी वापरलेला श्लेष नव्हे, तर लिपीचे न्यूनत्वच आहे. म्हणूनच ते दूर व्हायला हवे. आणखी एक उदाहरण ‘जप’चे पाहता येईल. 'माळ जप' आणि 'स्वत:ला जप', या दोन्ही वाक्यांत तो वेगळ्या उच्चारांचा आणि म्हणूनच अर्थांचा दिसतो. 'च'च्या बाबतीतही तेच सांगता येईल, चलन आणि चमचा, चक्र आणि चकाकी, चकीत आणि चकवा या शब्दजोड्यांमध्ये पहिल्या शब्दांतील ‘च’ अकार आणि दुसऱ्या शब्दांतील ‘च’चा अकार यात भिन्नता आहे. हे भेद दाखविण्याची सोय व्हावी, यासाठी आचार्य विनोबा भावे यांनी हिंदीतील नुक्ता वापरण्याची पद्धत मराठीत रुढ करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र ही पद्धत फारसी रुळली नाही.
स्वा. सावरकर आत्मार्पण दिन आणि त्याला जोडून येणाऱ्या मराठी भाषा दिनानिमित्त मातृभाषा जतनाचा वसा, आपण हाती घ्यायला हवा! तरच स्वा. सावरकरांच्या स्मृतीस अभिवादन करीत मराठी भाषा दिन खऱ्या अर्थाने साजरा झाला, असे म्हणता येईल.

- संकेत सातोपे

  • ------------------

http://m.lokmat.com/blog/editorial/what-savarkars-role-language-purification/

गुरुवार, १५ मार्च, २०१८

केरळमध्ये 'केशरी' नारळाच्या लागवडीवर बंदी!

केरळमध्ये 'केशरी' नारळाच्या लागवडीवर बंदी!


केशरी रंगाच्या नारळ लागवडीवर केरळ शासनाने कायमची बंदी घातल्याचे कळते. इतकेच नव्हे, तर जिथे जिथे हे केशरी नारळ दिसतील तिथून ते मुळासकट उपटून 'लाल' मातीत पुरून टाकण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

गेल्या काही वर्षांत देशभरात या केशरी नारळांचे बेसुमार पीक आल्यामुळे अन्य प्रजातींचे उत्पादक कमालीचे चिंतेत आहेत. त्यातच केशरी नारळ लागवडीसाठी अत्यंत अयोग्य असलेल्या ईशान्य भारतातील मातीतही अलीकडे हे केशरी माड रुजू लागल्याने त्यांच्या चिंतते भर पडली आहे. तुलनेने कमी पाण्यात अधिक आणि झटपट उत्पन्न देणारे हे केशरी पीक देशात सर्वांकडूनच स्वीकारले गेल्यास अन्य वाण नामशेष होण्याची भीती आहे. जीर्ण वडाच्या पारंब्या पाराचे भक्कम बांधकामही फोडत जातात, त्याच थाटात ईशान्येत काल उगवलेल्या या केशरी माडांच्या कोवळ्या मुळांनी चक्क भले मोठे पुतळे कलथून टाकण्यास प्रारंभ केला.

त्यामुळे वरपांगी आकर्षक दिसणारे, हे घातकी माड निदान केरळच्या लाल भडक मातीत तरी फोफावू नयेत, यासाठी आतापासूनच विशेष दक्षता घेण्यात येत आहे. या केशरी प्रजातीला पोषक ठरणाऱ्या आणि कोणत्याही खतपाण्याविना केवळ श्रमदानातून कुठेही उगवणाऱ्या खाकी वनस्पतीही मुळासकट नष्ट करून टाकण्याच्या गुप्त सूचना श्रेष्ठींकडून देण्यात आल्याचे कळते. तसेच गेली अनेक वर्षे सातत्याने या वनस्पतींची तोड करूनही, कातळावरील निवडुंगासारख्या त्या पुन्हा-पुन्हा उगविण्याची कारणे शोधण्यासाठी विशेष समितीही नेमण्यात आली आहे.

(सूचना - हे निव्वळ कृषीवृत्त असून याचा राजकीय सद्यस्थितीशी कोणताही संबंध नाही)

- संकेत सातोपे