सोमवार, २३ जुलै, २०१८

जातीयवादाची व्यंकटी सांडो!

कोणत्याही कारणाने का असेना, पंढरीत शासकीय पूजेपासून आज एका ब्राह्मणाला रोखले; याबद्दल अनेक ज्येष्ठ पुरोगामी मंडळींना आनंदाच्या उकळ्या फुटतायत. काहीशे वर्षांपूर्वी अशाच जातिभेदामुळे संत चोखामेळा यांना मंदिराच्या पायरीशी रोखून धरणाऱ्या सनातनी मानसिकतेत आणि या कथित पुरोगामी मानसिकतेत एक प्रकारचे किळसवाणे साम्य आहे. जातीअंत म्हणजे कुठूनही फक्त ब्राह्मणांना चोपणे का? जातीभेद काय फक्त ब्राह्मणच पाळतात? राजकारण, सत्ताकारण यापासून त्यांना दूर ठेवल की, जातीअंत साधेल का? हे प्रश्नही आपण स्वतः विचारलाय हवेत ना?

इथे आणखीन एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे, ब्राह्मणेतरांमध्येही जातीचा अहंकार आणि मग्रुरी आहे, म्हणजे ब्राह्मणांमध्ये नाहीच असंही नाही. म्हणूनच काल देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या काही पोस्ट फिरत होत्या, त्यात ब्राह्मण मुख्यमंत्र्याबाबतचा टेम्भा मिरवण्यात येत होता. विशिष्ट जातीचा मुख्यमंत्री पूजा करू शकला नाही याबाबत आनंद मानणारे कथित पुरोगामी आणि आपल्या जातीचा माणूस मुख्यमंत्री होऊ शकला या खुशीत गाजर खाणारे, या दोन्ही मानसिकता एकाच जातीयवादी ओंगळ नाण्याच्या दोन गलिच्छ बाजू आहेत.

ब्राह्मणत्व, मराठत्व, दलितत्व ही सगळी ‘त्व’ एका समाजत्वात विरघळून जावो… शिवछत्रपतींचा खराखुरा पुरोगामी आणि जातिरहित महाराष्ट्र पुन्हा घडो... आडनावातून ‘आपला माणूस’ शोधणाऱ्या खळांची व्यंकटी सांडो… आणि परस्परा जीवाचे मैत्र जडो… हीच त्या सर्वव्यापी पांडुरंगा चरणी मनःपूर्वक प्रार्थना...🙏🙏🙏
             
                                                            -संकेत सातोपे

1 टिप्पणी:

  1. अतिशय समर्पक. जातीयवाद नष्ट करणे म्हणजे फक्त उच्चवर्णीयांची मक्तेदारी मोडून काढणे एवढाच अर्थ नाही तर मुळातच जातीचा अभिमान आणि जातीवरून योग्यता ठरवण्याची मानसिकताच नष्ट झाली पाहिजे आणि सगळ्यांकडे सामानतेने बघण्याची दृष्टी येईल तेव्हाच जातीयवाद संपला असं म्हणता येईल 👍👍

    उत्तर द्याहटवा