कशेळी…! उण्या-पुऱ्या दोन-अडीच हजार लोकसंख्येचं एक अस्सल कोकणी खेडं! वर्ष-दोन वर्षांमागे गावात लग्नाच्या पंगती उठत होत्या आणि बाहेर सायकलवर एका कुल्फीवाल्याने धंदा थाटला होता. तोडक्या- मोडक्या मराठीच्या आधाराने तो गल्ला जमवत होता. काही वेळाने लक्षात आलं की तो 'भय्या' आहे. रोजगाराच्या संधीच्या शोधत जिथले गावकरी वर्षानुवर्षं चाकरमानी झाले आहेत; त्या गावात याने शेकडो मैलांवरून येऊन रोजगार मिळवलेला पाहून जरा आश्चर्यच वाटलं.
कोकणाचं कॅलिफोर्निया होईल की नाही ते माहीत नाही; पण (राजकारणात अडकलेले) जैतापूर-नाणारसारखे येऊ घातलेले प्रकल्प पाहिले, तर कोकणाची लवकर महामुंबई होणार हे नक्की. चिपळूण-दापोली भागात लोढाने बांधलेल्या घरांच्या जाहिराती वरचेवर पाहायला मिळत आहेत. रत्नागिरीसारख्या शहरातील व्यवसायावर तर केव्हाच मारवाड्यांनी पकड बसवायला सुरुवात केली आहे. बोरकरांच्या कवितेतलाही 'मत्स्यगंध वारा' सोसणार नाही, अशा जैन वसाहतीही कुठे-कुठे नाक वर काढताना दिसत आहेत. आंबे काढणीसाठी नेपाळ्यांचे जथ्थेच्या जथ्थे इथे मुक्कामाला असतातच. कोकण बदलतंय, खूप वेगाने! विविध प्रकल्प सुरू झाल्यानंतर तर स्थलांतर आणखी वेग घेणार आहे. आता कोकणी माणूस या वेगावर स्वार होतो की अन्य स्वारांच्या वेगाखाली भरडला जातो, ते येणारा काळच दाखवेल.
रोमपासून ते इंग्लंडपर्यंत व्यापार करणाऱ्या कोकणाने आजवर अनेक स्थित्यंतर पाहिली. मुळात किनारपट्टीचा भाग असल्यामुळे अन्य कोणत्याही भूवेष्टित प्रदेशापेक्षा सहस्रो मैलांवरून येणारे बदल येथे देशी सरमिसळ न होता थेट आले. हेच पहा, बुरख्याचं भारतीयकरण होताना उत्तरोत्तर घुंगट-पदर असे बदल झाले. म्हणजे खुश्कीच्या मार्गाने आलेल्या इस्लामचा सर्वांत जास्त प्रभाव उत्तरेकडच्या राज्यांवर पडला, त्यामुळे तिथे अगदी बुरख्याच्या जवळ जाणारी घुंगट पद्धत आलेली दिसेल. पण महाराष्ट्रात केवळ 'डोईवर' पदर घेण्याची प्रथा! तेच आणखी जसजसे खाली-खाली जालं, तसं डोक्यावर पदर घेणं कमी कमी होत, केरळमध्ये तर अशी पद्धतच मुळी नाही. कथ्थक आणि भरतनाट्यम् चे पेहराव डोळ्यांपुढे आणून पहा, त्यातही या 'प्रभावां'मधलं अधिक-उणेपण लक्षात येईल. कोकणात मात्र शेकडो मैलांवरून शेकडो वर्षांपू्र्वी आलेल्या चालीरिती- बोलीच काय जनजातीसुद्धा त्यांची शारीरिक वैशिष्ट्यं बहुतांश जशीच्या तशी वागवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. निळे डोळे, श्वेतच म्हणावा असा गोरा वर्ण, वांगाचे ठिपके ही आजही ठळकपणे दिसणारी वैशिष्ट्यं उष्णकटिबंधीय दमट वातावरणात नक्कीच निर्माण झालेली नसणार. अलिबागच्या किनाऱ्यावर सिनेगॉग उभारणारे आणि कोकणी 'करां'ती आडनावं घेऊन इस्रायलला परतलेले ज्यू किंवा अगदी मराठी भाषक झालेले गोव्याच्या किनाऱ्यावरील हबशी, हे सगळेच थेट कोकणात आले आणि त्यांच्यावर कोकणी मातीतच देशीकरणाचे षोडशोपचार झाले. त्यामुळे या लाल मातीला स्थलांतरं नवीन नाहीत.
बदल स्वीकारत गेलो, तर प्रवाहीपण राहतं; नाहीतर माणसाचं काय किंवा समाजाचं काय डबकं होऊन जातं. पण बदल आंब्यावर पायरी-हापूसऐवजी शेवग्याचं कलम करणारे असले, तर मात्र ते झाडाच्याच मुळाशी येऊ शकतात. हेच मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये झालेलं आपण आज पाहात आहोत. या गल्लेभरूंच्या पाशवी स्थलांतरात सर्वांत पहिला बळी जातो तो स्थानिक संस्कृती आणि त्याचा अविभाज्य घटक असलेल्या भाषेचा. तो जाऊ द्यायचा नसेल, तर राजकीय नव्हे तर वैयक्तिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. कारण भाषेच्या काय किंवा धर्माच्या काय राजकारणाने मोठे होतात ते नेते आणि पक्ष; भाषा किंवा धर्म नव्हे. वर्षभर बंगळुरात राहिल्यानंतर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, दक्षिणेत त्यांच्या भाषा टिकवल्या त्या भाषकांनी नेत्यांनी नव्हे. तिथे प्रत्येक माणसाला आपल्या भाषेचा केवळ अभिमानच नाही, तर गरजही वाटते. आपल्या भाषेत आपल्याला अधिक चांगलं कळतं, व्यक्त होता येतं, याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळेच त्यांना एखादा दुकानदार आपली भाषा बोलत नाही म्हणून त्याला थोबडावून काढ, कधी २-५ टॅक्सी फोड, मातृभाषेच्या जतनासाठी परिसंवाद-संमेलनं घे, असल्या बोथट तलवारींनी लढावं लागत नाही. 'केवळ अभिनिवेश म्हणून नव्हे, तर स्वाभाविकरित्याच आम्ही आमच्या भाषेत चित्रपट पाहतो, तुमच्या भाषेतला तुम्ही डब करून आणलात तरच तो आम्हाला कळतो; तुम्ही आमच्या भाषेत विकायला आलात तरच आम्हाला तुमच्या वस्तू घेता येतील, नाहीतर आम्हाला व्यवहार करणंच कठीण आहे. हा अगदी कुठलाही गाजावाजा न करता बनून गेलेला घरोघरीचा स्वभावधर्मच आहे. त्यामुळे मी पत्रकारांशी हिंदीत बोलणार नाही, हा तिथला राजकीय स्टंट नसतो, तर सहजकर्म असतं आणि ते इथे येणाऱ्यांच्याही सहज अंगवळणी पडलेलं दिसतं. दोन-दोन पिढ्या मुंबईत राहूनही दुकानदार मराठीत ४ वाक्य बोलू शकत नाहीत. पण १०-१२ वर्षं दक्षिणेत राहिले की स्थानिक भाषेत सहज व्यवहार कसे करू शकतात, याचं उत्तरही या 'स्वभावधर्मातच' आहे.
एखाद्या मालिकेत कुणीतरी मुंबईची भाषा हिंदी आहे म्हटल्यावर आम्ही त्यांना धमकावतो, त्यांच्याकडून तोंडदेखली क्षमायाचना करवून घेतो आणि मराठीचं संवर्धन झाल्याच्या मस्तीत पुन्हा वावरायला लागतो. असले शेकडो तोंडपूजे माफीनामे सत्ताधाऱ्यांना पाठवून त्यांच्या नाकाखालून आपल्या स्वराज्याच्या ध्वज उभारणाऱ्या शिवछत्रपतींचा आदर्श नक्की घेतलाय तरी कुणी? बिनबोभाट कार्यसिद्धी महत्त्वाची की प्रसिद्धीचा भपका? तलवार की मखमली म्यान? करवंट्या की खोबरं? हे प्रश्न राजकारण्यांसाठी नव्हे, तर तुमच्या माझ्यासाठी आहेत. कारण राजकारण्यांना फक्त तलवार म्यानातून काढून व्यासपीठावर दाखवायची आहे. रोजची अटीतटीची लढाई लढायचीय ती, तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांना.
कोळ्यांच्या मुंबईत माशांचा वास सहन न होणाऱ्या वसाहती उभ्या राहिल्या आहेत आणि पर्युषण पर्वात मांसविक्री बंद ठेवण्याची सक्ती करण्यात येत आहे. दैनंदिन व्यवहारातील मराठीशी अन्य भाषकांची सोडाच, मराठी माणसाचीही नाळ केव्हाच तुटली आहे. एकंदरीतच आगरी-कोळ्यांच्या मुंबईचा तोंडवळा आपल्याला मराठमोळा राखता आलेला नाही, हे अपयशी वास्तव आता मान्य करून निदान अन्य ठिकाणी तरी वेळीच जागं होण्याची गरज आहे. नाहीतर मुंबईप्रमाणेच कोकणातही लवकरच 'पयल नमन'ऐवजी, 'हमार ललनवा' चे स्वर ऐकू येतील. शिमग्याऐवजी छटपूजेच्या वेळी कोकण गजबजेल आणि 'कोकणी माणसाचे मुख्य अन्न कोणते? या प्रश्नाचं उत्तर भात व मासे असं देता येईल, पण ते इतिहासाच्या पेपरात; भूगोल किंवा परिसर अभ्यासाच्या नव्हे!
© - संकेत सातोपे

मार्मिक, असेच विचार प्रकट करत जा. शुभेच्छा
उत्तर द्याहटवाVery true...
उत्तर द्याहटवाकोकणी माणसाला आपल्या भूमीत असणारी संधी आणि आवाहन यावर उत्तम लेखन केले आहे...
उत्तर द्याहटवालेख नुसताच वाचनीय नाही तर चिंतनीय आणि म्हणून डोळ्यात अंजन घालणारा आहे. वेळीच डोळे अुघडले नाहीतर कोकणाचे डोळे मिटायला वेळ लागणार नाही. मग पुस्तकात कोकण कसा होता, यावरची रसभरीत वर्णनें वाचण्यावर भागवावे लागेल. आणि अशी वेळ आल्यास आपल्यासारखे कर्मकरंटे आपणच ठरु यातही शंका नाही.
उत्तर द्याहटवाविचार करायला लावणारे भयाण वास्तव...
उत्तर द्याहटवाविचारप्रवण लेखन👍👍
उत्तर द्याहटवाअगदी बरोबर, सद्य परिस्थिती आहे पण खेद जनक आहे.
उत्तर द्याहटवावास्तविक चित्र अगदी छान शब्दात मांडले आहे.
उत्तर द्याहटवावास्तवाची तीव्र जाणीव करून देणारा लेख आहे
उत्तर द्याहटवाआपण नुसते लेखच लिहीत बसायचे. एक लेख लिहिण्याच्या वेळेत एक परप्रांतीय कुटुंब इथे येऊन स्थायिक झालेलं असतं. पण ही परिस्थिती केवळ कोकणच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रावर गुदरली आहे.
उत्तर द्याहटवामार्मिक लेख
उत्तर द्याहटवा-किरण गवस
चिंतनीय! फार गांभीर्याने विचार व्हायला हवा याबाबत...
उत्तर द्याहटवा