काही दिवसांपूर्वी माझी दुचाकी घेऊन मुंबईत गेलो होतो. राहाणं नालासोपाऱ्यात असल्यामुळे परतायला रात्र झाली. मुंबईच्या गोरेगाव- बोरिवली या उपनगरांत मार्ग मोकळे होते. मार्गांवर संकेत दिवे(सिग्नल) सुरू होते. अर्थात अजून तरी पत्रकारितेचा माज आलेला नसल्याने सर्व वाहतुकीचे नियम पाळण्याकडे कल आहे. त्यामुळे जिथे म्हणून लाल दिवा दिसला तिथे तिथे थांबलो. दिवा हिरवा झाल्यावरच पुढे निघालो. पण काय आश्चर्य मार्ग मोकळा असल्याने त्या लाल दिव्यांकडे कोणी ढुंकूनही पाहात नव्हतं. उलट वाटेतच थांबल्यामुळे मलाच लोकं मूर्खात काढत होते. काही गाड्या तर इतक्या भरधाव होत्या की लालदिवा पाहून थांबणाऱ्या मला उडवूनच देतील की काय अशी भीती वाटावी.
नियम पाळणाऱ्यालाच नेहमी कशाची ना कशाची भीती बाळगावीच लागते, हे पुन्हा एकादा पटलं त्या दिवशी. मनात विचार आला कोणाचं योग्य? मार्ग मोकळा असतानाही व्यवहारशून्यपणे किंवा 'पांढरपेशी दांभिककेतेने' लाल दिव्याशी थांबणारा मी ? की थोडसं व्यवहारीपणे म्हणा किंवा सारासार विवेकाने म्हणा वाहतुकीचे नियम मोडणारे इतर लोकं? आणि मग या प्रश्नाच्या मुळाशी नेणारा आणखी एक प्रश्न पडला की, सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यात निर्बंध आणि सारासार विचार यांच्यात फारकत होण्याचे प्रसंग सतत येतातच, अगदी रहदारीचे मार्ग अडवून बसलेले फेरीवाले, मुजोरी करणारे रिक्षा- टॅक्सीवाले अशा एक ना अनेक अनधिकृत गोष्टी आपल्याला दिसत असतात. त्यावेळी निर्बंधावर बोट ठेवावं की मनाला पटतं, विवेकाला पटतं ते करावं?
सकृतदर्शनी विवेकाला पटतं किंवा मनाला योग्य वाटतं तेच करावं असं सगळ्यांचंच मत पडेलं. पण मग प्रत्येकाचा विवेक आणि मनोधारण वेगवेगळ्या असतात. त्यानुसार सगळेच वागू लागले तर केव्हढी अनागोंदी माजेल. ती तशी माजू नये म्हणूनच तर आपण नियम- निर्बंध बनविले ना.... मला तरी हा अजब तिढा वाटतो. माणसाने स्वत:च्याच सोयीसाठी सारासार विवेकाने बनविलेले आणि पाळायचे ठरविलेलेच निर्बंध प्रत्यक्षात पाळताना त्यालाच अविवेकी वाटतात, जाचक वाटतात.
कदाचित हे नियम आपणच आपल्यासाठी तयार केले आहेत. याची त्याला जाणीव नसल्यामुळे असं होतं असेल का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा