हल्ली कोणताही ऐतिहासिक चित्रपट आला की, तो उजव्यांचा की डाव्यांचा हे आधी ठरवलं जातं. एकदा तशी शिक्कामोर्तब झाली की मग लगेच त्याचे समर्थक आणि विरोधक सोशल मीडियावरून रान उठवायला सुरुवात करतात. ‘छावा’मधूनही बामणे, भटूकडे, मनुवादी, संघी, हिंदुत्ववादी, उजवे आणि ‘चळवळी’तले, डावे, समाजवादी, सेक्युलर, फेक्युलर, ब्रिगेडी, बहुजनवादी अशा बिरुदांनी ओळखल्या जाणाऱ्या दोन प्रमुख गटांना त्यांच्या संकल्पनेतले छत्रपती संभाजी महाराज मोठ्या पडद्यावर पाहायचे होते. बरं, या दोन्ही गटांच्या समर्थकांची संख्या इतकी लक्षणीय आहे की, यातल्या एकाही गटाच्या मनातील ‘शंभू-प्रतिमेला’ धक्का लावणारं काही चुकूनही दाखवणं निर्माता चमूला व्यावसायिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं. पण वरील दोनपैकी एका गटात मोडणारा असं या चित्रपटाचं वर्गीकरण चटकन प्रेक्षकांना करता न येणं, याचाही या चित्रपटाच्या यशाला हातभार आहे.
संपूर्ण चित्रपट छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई याभोवतीच फिरणारा आहे. एकट्या मुघलांशी पाण्यातून, जंगलात, किल्ल्यावर अशा तीन-चार लढाया दाखवण्याऐवजी, जंजिऱ्याचा सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीज आणि म्हैसूरचा चिकदेव अशा विविध ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेच्या लढाया दाखवायला दिग्दर्शकाला आयते अॅक्शन प्लॉट उपलब्ध होते. त्यातही जंजिऱ्याची नाविक लढाई वेगळेपणानेही दाखवता आली असती. पण हे सर्व मोह टाळून त्याने फक्त औरंगजेब खलनायक आणि संभाजीराजे नायक हेच चित्रपटाचं सरळसोट सूत्र ठेवलं. यामुळे संभाजीराजांच्या युद्धनीतीबद्दल अधिकाधिक माहिती पोहोचवता येण्याची संधी हुकली असली, तरीही ज्यांना संभाजीराजांबद्दल फारसं माहिती नाही, त्यांना नायकविरुद्ध खलनायक हे थेट समीकरण समजून घ्यायला सोपं झालं.
चित्रपटाचे कथानक सोपं करणारा हाच दिग्दर्शक उपरोक्त दोन गटांमधील वर्गिकरणाच्या तडाख्यातून सहीसलामत बचावून नेणारे काही प्रसंग चित्रपटात किती खुबीने पेरतो पहा. संभाजीराजे बुऱ्हाणपूरच्या स्वारीवरून परततात, तेव्हा त्यांच्या हस्ते भेट-वस्तू स्वीकारणारी एक मुसलमानी पगडी आवर्जून दाखवली जाते - सेक्युलर खूश. अनाजी पंताला हत्तीच्या पायांखाली देण्याचा भव्य सीन - बामण्यांचे विरोधक खूश. आता राहिले उजवे. एरव्ही संपूर्ण चित्रपटातल्या कोणत्याही लढाईत मुघल सैनिकांच्या तोंडी चुकूनही ‘दीन-दीन, अल्लाहू अकबर’ अशी कोणतीही घोषणा नाही. बुऱ्हाणपूर लुटीच्या प्रसंगात तर मराठे आल्याचं कळल्याबरोबर गढीच्या दाराजवळ धावून आलेल्या सैनिकांना आवेशाने तोंडतून बाहेर पडेल अशी युद्धघोषणाच दिलेली नसल्याने ते बावचळून नुसते ‘एSSS’ ओरडताना दिसतात. पण हा चित्रपट उजव्यांसाठीही करायचा आहेच. त्यामुळे अगदी शेवटाकडच्या प्रसंगात औरंगजेब पुटपुटतो, ‘...सिर्फ तुम्हे अपना धर्म बदलना पडेगा’.
सध्या सोशल मीडियावर उपरोक्त दोन्ही गटातील मंडळींच्या ज्या पोस्ट फिरतायंत, त्या पाहिल्या की दिग्दर्शकाने ‘छावा’ची नौका बॉक्स ऑफिसवर ‘गटां’गळ्या खाऊ नये म्हणून केलेल्या तारेवरच्या कसरती सार्थकी लागल्याचं दिसेल. कुणी म्हणतंय, ‘गद्दार बामण्यांना कसं हत्तीच्या पायी दिलयं ते पाहायचं असेल, तर छावा पहा.’ कुणी म्हणतंय, ‘हिंदू धर्माच्या अस्मितेसाठी बलिदान कसं करावं याची प्रेरणा घ्यायची असेल, तर छावा पहा.’ गंमत म्हणजे, ‘ब्रिगेडींच्या अपप्रचाराला बळी पडू नका आणि बामणी काव्याला भूलू नका,’ अशा नांदीने सुरुवात होणाऱ्या या दोन्हीकडंच्या प्रचारनाट्यांचं भरतवाक्य मात्र, ‘तर छावा पहा’, हेच आहे.
भूतकाळात होऊन गेलेल्या महनीय व्यक्ती या त्यांच्या कालखंडात आणि प्राप्त परिस्थिती त्यांना जे सर्वाेत्तम करता येणं शक्य होतं, ते केल्यामुळेच आदरणीय-वंदनीय ठरत असतात. त्यांच्या जीवन चरित्राचा उपयोग सध्याच्या राजकीय किंवा सामाजिक परिस्थितीत आपापल्या विचारधारेला टेकू म्हणून करणारे लोकं, कोणत्याही महापुरुषाचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यात यशस्वी ठरणं कठीणच असतं. ‘आम्हीच खरा इतिहास सांगतो’, असा कंठशोष करणाऱ्या या मंडळींचं म्हणणं खरंतर, ‘आम्ही सांगतो तोच खरा इतिहास आहे,’ असंच असतं. इतिहास हा कितीही निष्पक्षपातीपणे लिहिण्याचा प्रयत्न केला तरीही तो सापेक्षच असतो. त्यामुळे त्याला खऱ्या-खोट्याच्या तगडीत तोलण्याचे प्रयत्न फोल ठरतात. दुर्दैवाने, सांप्रतचे अभिनेवेश बाजूला ठेवून इतिहासाकडे पाहू शकणारे जनमतच सध्या क्षीण होत चालले आहे. त्यामुळेच कोणत्याही ऐतिहासिक कथानकाला हात घालणाऱ्या दिग्दर्शक-निर्मात्यांना उतेकर यांच्यासारखी तारेवरची कसरत करण्याला प्रत्यवाय राहत नाही.
सुदैवाने जेव्हा, ‘श्रूती धन्य जाहल्या, श्रवून अपूलि वार्ता, रण सोडून सेना सागर अमूचे पळता’ अशा ऐतिहासिक तथ्याला अजिबात धरून नसलेल्या कवितेच्या ओळी असलेला ‘विशाखा’ प्रसिद्ध झाला, तेव्हा ‘सत्य इतिहास संशोधकां’चे गल्लोगल्ली पेव फुटायचे होते. नाहीतर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या तेजस्वी स्फूर्तीगीताची भ्रूणहत्याच झाली असती. ‘हाताशी थोडी-फार मुलं असती, तर कोणीही किल्ले घेतले असते, शिवाजीने किल्ले घेतले त्याचा आम्हाला का त्रास’, असले विनोद करणाऱ्या पुलंना अभिनिवेशी नवइतिहासकारांनी मनुवादी किंवा राष्ट्रद्रोही या गटात टाकलं असतं. एकंदरीतच, ऐतिहासिक आशय(कंटेंट) आणि ऐतिहासिक कथानकावर बेतलेला ललित आशय या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि दोन्हीच्या प्रसूतीचे हेतूही भिन्न आहेत, याची जाणीव त्या पिढीत शाबूत होती. आता अभिनिवेशाच्या वेष्टनात गुंडाळून इतर सर्वच जाणिवा गंजवून सोडण्याचा एककलमी कार्यक्रम सर्वच राज्यकर्त्या आणि समाजकर्त्या मंडळींनी हाती घेतला आहे आणि त्यासाठी त्यांच्या हाती लागलेले सर्वात घातक शस्त्र आहे, ते म्हणजे ‘सोशल मीडिया’!