तशी ती संस्कारी घरातली; घरी स्नान-संध्या, उदात्त विचारांची देवाण-घेवाण, विचारवंतांची उठबस, वगैरे, वगैरे नित्यक्रम. पण काहीशा ठेगण्या, कृश कमलला, आपल्याला कुणी वरेल याची खात्रीच नव्हती. हा न्यूनगंड घेऊन अनेक नकार पचवतं, ती रोज सायंकाळी घराच्या गच्चीत खालून जाणाऱ्या वाटसरूंकडे शून्य नजरेने पाहात बसायची.
पण! प्रत्येकाचा येतो तसा तिचाही एक दिवस आलाच. सहज म्हणून त्याने नजर वर केली, ती या हताश विवाहेच्छुकीशी भिडली. तरण्याबांड पण काहीशा उनाड आणि टर्रेबाज अशा या मुलालाही त्याची नित्य मुजोरी चालवून घेणारी एखादी अबला संसार रेटायला हवीच होती. दोघांचीही गोत्रे भिन्न पण जाती एक, म्हणून घराचांनीही बिनबोभाट पसंती दिली.
झाला दोन गरजूंचा संसार उभयतांची गरज होती, तोवर चांगला वीसएक वर्षं चालला. पण आता कमलही चांगली कमावती होऊन, तिचा न्यूनगंड पार चेपला गेला होता. ती मुजोरी चालवून घेईना. त्याच्यातही आता वयोमानपरत्वे रेटून नेण्याची पहिली उमेद उरली नव्हती. शेवटी प्रकरण विकोप्याला गेले. पण विभक्त होउनही एकेकट्याने दोघांचा पाड लागेना. म्हणून डोक टेकायला त्यांनी खांदे शोधलेच. अर्थातच समाजाने ही नाती अनैतिक ठरवली.
पण माणसाला एकदा अनैतिक सुखाची गोडी लागली की, त्याचा पाय कुठवरं घसरेल याचा नेम नाही. ज्या गच्चीतून संध्येचे बोल कानी घेत ती खाली बघायची, तिथेच ती आता सुगंधी गजरे माळून वाटसरूंकडे प्रणयोत्कट कामेच्छेने पाहू लागली. अरे, तो एक नाही तर त्याच्यासारखे छप्पन, अशा अहंगंडाने कालच्या हताशेची जागा घेतली होती. त्याला धडा शिकवण्याच्या ईर्ष्येत आपण स्वत:च चारित्र्य पणाला लावत आहोत, याची पुसटशीही जाणीव तिला नव्हती. तिला फक्त डाव जिंकायचा होता. त्यासाठी कितीही आणि कोणत्याही पुरुषांना छाताडावर नाचवायची तिची तयारी होती.
अखेर व्हायचं तेच झालं. कालच्या या सुसंस्कृत गच्चीची, आज उपभोगलोलूप माडी झाली. आता या माडीचे जिने कोण-कोण चढतं असतील!? सुज्ञास सांगणे न लगे.
संकेत सातोपे
(तळटीप: ही एक सामाजिक क(व्य)था आहे; राजकीय नव्हे.)