बुधवार, १२ जुलै, २०२३

गच्चीची माडी होते तेव्हा

तशी ती संस्कारी घरातली; घरी स्नान-संध्या, उदात्त विचारांची देवाण-घेवाण, विचारवंतांची उठबस, वगैरे, वगैरे नित्यक्रम. पण काहीशा ठेगण्या, कृश कमलला, आपल्याला कुणी वरेल याची खात्रीच नव्हती. हा न्यूनगंड घेऊन अनेक नकार पचवतं, ती रोज सायंकाळी घराच्या गच्चीत खालून जाणाऱ्या वाटसरूंकडे शून्य नजरेने पाहात बसायची.

पण! प्रत्येकाचा येतो तसा तिचाही एक दिवस आलाच. सहज म्हणून त्याने नजर वर केली, ती या हताश विवाहेच्छुकीशी भिडली. तरण्याबांड पण काहीशा उनाड आणि टर्रेबाज अशा या मुलालाही त्याची नित्य मुजोरी चालवून घेणारी एखादी अबला संसार रेटायला हवीच होती. दोघांचीही गोत्रे भिन्न पण जाती एक, म्हणून घराचांनीही बिनबोभाट पसंती दिली.


झाला दोन गरजूंचा संसार उभयतांची गरज होती, तोवर चांगला वीसएक वर्षं चालला. पण आता कमलही चांगली कमावती होऊन, तिचा न्यूनगंड पार चेपला गेला होता. ती मुजोरी चालवून घेईना. त्याच्यातही आता वयोमानपरत्वे रेटून नेण्याची पहिली उमेद उरली नव्हती. शेवटी प्रकरण विकोप्याला गेले. पण विभक्त होउनही एकेकट्याने दोघांचा पाड लागेना. म्हणून डोक टेकायला त्यांनी खांदे शोधलेच. अर्थातच समाजाने ही नाती अनैतिक ठरवली. 


पण माणसाला एकदा अनैतिक सुखाची गोडी लागली की, त्याचा पाय कुठवरं घसरेल याचा नेम नाही. ज्या गच्चीतून संध्येचे बोल कानी घेत ती खाली बघायची, तिथेच ती आता सुगंधी गजरे माळून वाटसरूंकडे प्रणयोत्कट कामेच्छेने पाहू लागली. अरे, तो एक नाही तर त्याच्यासारखे छप्पन, अशा अहंगंडाने कालच्या हताशेची जागा घेतली होती. त्याला धडा शिकवण्याच्या ईर्ष्येत आपण स्वत:च चारित्र्य पणाला लावत आहोत, याची पुसटशीही जाणीव तिला नव्हती. तिला फक्त डाव जिंकायचा होता. त्यासाठी कितीही आणि कोणत्याही पुरुषांना छाताडावर नाचवायची तिची तयारी होती.


अखेर व्हायचं तेच झालं. कालच्या या सुसंस्कृत गच्चीची, आज उपभोगलोलूप माडी झाली. आता या माडीचे जिने कोण-कोण चढतं असतील!? सुज्ञास सांगणे न लगे.


  • संकेत सातोपे


(तळटीप: ही एक सामाजिक क(व्य)था आहे; राजकीय नव्हे.)

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०

कोकणी चष्म्यातून वैदर्भी बोली



माझे एक जेष्ठ सहकारी इरसाल नागपुरीत मला नेहमी म्हणायचे, 'जा बे, तुम्ही मुंबई-कोकणातले लोकं! तुमच्यासाठी महाराष्ट्र सिंधुदुर्गात सुरू होतो आणि रत्नागिरी- रायगडमार्गे मुंबईत येऊन संपतो. त्याच्यापुढे तुम्हाला थेट यूएस-यूके किंवा सिंगापूरच लागतं.' या गमतीमागच्या वास्तवाची सर्वाधिक जाणीव मला '१० नोव्हेंबर २०१९' या दिवशी विदर्भकन्येचं पाणिग्रहण केल्यापासून व्हायला लागली. विदर्भातल्या चालीरिती, बोली, समस्या तर सोडाच; पण विदर्भात नेमके किती आणि कोणते जिल्हे आहेत, याचीसुद्धा माहिती मुंबई-पुण्यात बसून अखंड महाराष्ट्रासाठी कंठशोष करणाऱ्या किती जणांना असेल याबाबत शंकाच आहे. हिंगोली, वाशिम, गोंदिया या नावाचे जिल्हे महाराष्ट्रात आहेत, याचा पत्ताही नसलेले महानगरी-महाराष्ट्रप्रेमी- महाभाग माझ्या पाहण्यात आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाबाबतचा अभिनिवेश व्यक्त करताना आचार्य अत्रे म्हणाले होते, अन्य राज्यांना फक्त भूगोल आहे, आमच्या महाराष्ट्राला इतिहास आहे. महाराष्ट्राचे एकंदर राजकारण- समाजकारण हे अशाच अभिनिवेशावर चालतं. त्यामुळेच इतिहासकार मेहेंदळे म्हणतात त्याप्रमाणे, 'आपल्याकडे इतिहास हा अभ्यासाचा नव्हे तर भावनेचा विषय आहे.' तीच गत भूगोलाचीही आहे.

पण गेल्या वर्षभरात 'करून राहिले, बोलून राहिले,'च्या पलीकडील वैदर्भीय भाषिक व्यवहारातील अनेक वैशिष्ट्यं मला हेरता आली, अनेक नवीन शब्द कळले, काही शब्दांच्या भिन्न अर्थछटांशी तोंडओळख झाली. वैदर्भीय बोलीवरील राष्ट्रभाषेचा अतिरिक्त प्रभाव तर सर्वपरिचित आहे. त्यातूनच दुहेरी क्रियापदं वापरण्याची पद्धत रूढ झालेली आहे. हिंदीतील 'क्या कर रहे हो'चेच शब्दशः मराठीकरणं म्हणजे 'काय करून राहिले आहेत'. तसंच 'आमच्याकडे हे असं असतं', 'माझ्या पिशवीत खाऊ असतो'; याऐवजी हिंदीतील 'रहता है' प्रमाणे 'आमच्याकडे हे असं राहातं', 'माझ्या पिशवीत खाऊ राहातो', असं बोललं जातं. हिंदीप्रमाणे दोन क्रियापदं वापरायची ही सवय या बोलीत इतकी भिनली आहे की, जेव्हा अशी दोन क्रियापद योजता येत नाहीत तेव्हा एकच क्रियापद दोन वेळा उच्चारला जात. उदाहरणार्थ, हे 'घेऊन घ्या' ना; ते 'देऊन द्या' ना. वस्तुतः मराठीत 'द्या, घ्या' इतकंच पुरेसं आहे. पण इतकं लहान क्रियापद वापरणं अस्सल वैदर्भी जिभेला सोसणारच नाही. हल्ली प्रमाण मराठीमध्येही 'खूप सारे' असा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. हासुद्धा अशाच प्रकारचा आहे. खरंतर मराठीत 'खूप' हा शब्द परिपूर्ण आहे. पण हिंदीत 'ढेर सारे' या दोन शब्दांचा मिळून अर्थ बनतो, त्याच्याच (चॅनलीय) प्रभावामुळे आता मराठीच्या माथीही 'खूप सारे' आला आहे. यातल्या 'सारे' चा अर्थ खूपच्या जवळपासही जाणारा नाही. असो!


विदर्भातल्या या दुहेरी क्रियापद पद्धतीचा एक लाभही आहे. तो म्हणजे प्रमाण मराठीत जी क्रियापद मुळातच दुहेरी आहेत आणि केवळ बोलीभाषेच्या सोयीसाठी ती जोडून किंवा एकत्र करून वापरली जातात, ती क्रियापदं ही मंडळी सवयीने सहजच प्रमाण मराठीत बोलतात. उदाहरणार्थ, 'काय करतोयस ऐवजी काय करत आहेस, मी येतोय ऐवजी मी येत आहे. तो जातोय ऐवजी जात आहे.' क्रियापदांच्या बाबतीतलं एक गणित मात्र मला अजून सुटलेलं नाही. ते म्हणजे, 'बोलल्या जात आहे, केल्या जात आहे, वापरल्या जात आहे.' यातले सगळे 'ले' वैदर्भीय मराठीत 'ल्या' का होतात? हा प्रभाव बंगालीचा असावा, असा माझा बाळबोध कयास आहे.


वाक्यरचनेबाबत आहे तसेच काही शब्दप्रयोगांच्या अर्थछटांबाबतही भेद (विशेषतः वऱ्हाडात) पाहायला मिळतात. म्हणजे फजिती होणे हा शब्दप्रयोग, मुंबई-पुण्यात जसा 'चारचौघात फजिती झाली, शाहिस्तेखानाची फजिती केली' अशा अर्थछटेसह वापरला जातो, तसा विदर्भात नाही. तिथे कोणत्याही प्रकारची अडचण होणे म्हणजे फजिती होणे. उदाहरणार्थ, लॉकडाऊनमध्ये बाहेरून काही मागवता येत नाही, फार फजिती झाली आहे; रेल्वेचं तिकीट मिळालं नाही, फजिती झाली. असाच काहीसा प्रकार 'तंतोतंत'च्या बाबतीत, 'तो अगदी तंतोतंत पोहोचला', म्हणजे वेळेत नव्हे तर वेळ संपता संपता. 'कीव येणे' हा शब्दप्रयोग थेट 'दया येणे' याच अर्थी वापरला जातो. आणि 'गाडी समोर घ्या, दुकान आणखी थोडं समोर आहे' याचा अर्थ 'पुढे आहे' असा असतो. असे अनेक शब्दप्रयोग आहेत, जे सध्याच्या मुंबई-पुण्यातल्या बोलीपेक्षा काहीशा वेगळ्या पद्धतीने-अर्थाने वापरले जातात.


वाक्यरचना, अर्थभिन्नतेबरोबरच काही शब्दही चटकन लक्षात न येणार असतात. कोथिंबीरला सांबार म्हणतात हे बहुतेकांना माहीत असेल, पण टोप-भांड्याला गंज म्हटलं जातं. धुण्याच्या कपड्यांना पारथे, कोळ्याला कातीण, आंधळ्याला भोकना, बेचकीला गुलेर म्हटलं जातं. भयाड म्हणजे बावळट, चटोरी म्हणजे हावरट आणि मधात भेटू म्हणजे मध्यवर्ती ठिकाणी असा अर्थ घ्यायचा असतो. लुस्त हा हिंदीतल्या चुस्तचा विरुद्धार्थी शब्द आहे. बारीक होण्याला रोड होणे आणि चुका काढण्याला कुच्या काढणे म्हटलं जातं.


कोकणी आणि नागपुरी मराठीत सगळ्यात मोठा भेद आहे तो लहजाचा. कोकणात साधा 'हो'सुद्धा 'होsssय' असा हेल काढून बोलला जातो आणि नागपुरीत कोणताही शब्द न ताणता अगदी थेट! पण हे असे कितीही भेद दाखवता आले, तरीही ही दोन्ही एकाच मायमराठीची लेकरं आहेत. त्यामुळे त्यांच्यात गोडवा मात्र तोच आहे, अमृताशी पैजा जिंकणारा!


© - संकेत सातोपे

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

मराठमोळे कोकण 'महामुंबई'च्या वाटेवर!

कशेळी…! उण्या-पुऱ्या दोन-अडीच हजार लोकसंख्येचं एक अस्सल कोकणी खेडं! वर्ष-दोन वर्षांमागे गावात लग्नाच्या पंगती उठत होत्या आणि बाहेर सायकलवर एका कुल्फीवाल्याने धंदा थाटला होता. तोडक्या- मोडक्या मराठीच्या आधाराने तो गल्ला जमवत होता. काही वेळाने लक्षात आलं की तो 'भय्या' आहे. रोजगाराच्या संधीच्या शोधत जिथले गावकरी वर्षानुवर्षं चाकरमानी झाले आहेत; त्या गावात याने शेकडो मैलांवरून येऊन रोजगार मिळवलेला पाहून जरा आश्चर्यच वाटलं.

कोकणाचं कॅलिफोर्निया होईल की नाही ते माहीत नाही; पण (राजकारणात अडकलेले) जैतापूर-नाणारसारखे येऊ घातलेले प्रकल्प पाहिले, तर कोकणाची लवकर महामुंबई होणार हे नक्की. चिपळूण-दापोली भागात लोढाने बांधलेल्या घरांच्या जाहिराती वरचेवर पाहायला मिळत आहेत. रत्नागिरीसारख्या शहरातील व्यवसायावर तर केव्हाच मारवाड्यांनी पकड बसवायला सुरुवात केली आहे. बोरकरांच्या कवितेतलाही 'मत्स्यगंध वारा' सोसणार नाही, अशा जैन वसाहतीही कुठे-कुठे नाक वर काढताना दिसत आहेत. आंबे काढणीसाठी नेपाळ्यांचे जथ्थेच्या जथ्थे इथे मुक्कामाला असतातच. कोकण बदलतंय, खूप वेगाने! विविध प्रकल्प सुरू झाल्यानंतर तर स्थलांतर आणखी वेग घेणार आहे. आता कोकणी माणूस या वेगावर स्वार होतो की अन्य स्वारांच्या वेगाखाली भरडला जातो, ते येणारा काळच दाखवेल.


रोमपासून ते इंग्लंडपर्यंत व्यापार करणाऱ्या कोकणाने आजवर अनेक स्थित्यंतर पाहिली. मुळात किनारपट्टीचा भाग असल्यामुळे अन्य कोणत्याही भूवेष्टित प्रदेशापेक्षा सहस्रो मैलांवरून येणारे बदल येथे देशी सरमिसळ न होता थेट आले. हेच पहा, बुरख्याचं भारतीयकरण होताना उत्तरोत्तर घुंगट-पदर असे बदल झाले. म्हणजे खुश्कीच्या मार्गाने आलेल्या इस्लामचा सर्वांत जास्त प्रभाव उत्तरेकडच्या राज्यांवर पडला, त्यामुळे तिथे अगदी बुरख्याच्या जवळ जाणारी घुंगट पद्धत आलेली दिसेल. पण महाराष्ट्रात केवळ 'डोईवर' पदर घेण्याची प्रथा! तेच आणखी जसजसे खाली-खाली जालं, तसं डोक्यावर पदर घेणं कमी कमी होत, केरळमध्ये तर अशी पद्धतच मुळी नाही. कथ्थक आणि भरतनाट्यम् चे पेहराव डोळ्यांपुढे आणून पहा, त्यातही या 'प्रभावां'मधलं अधिक-उणेपण लक्षात येईल. कोकणात मात्र शेकडो मैलांवरून शेकडो वर्षांपू्र्वी आलेल्या चालीरिती- बोलीच काय जनजातीसुद्धा त्यांची शारीरिक वैशिष्ट्यं बहुतांश जशीच्या तशी वागवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. निळे डोळे, श्वेतच म्हणावा असा गोरा वर्ण, वांगाचे ठिपके ही आजही ठळकपणे दिसणारी वैशिष्ट्यं उष्णकटिबंधीय दमट वातावरणात नक्कीच निर्माण झालेली नसणार. अलिबागच्या किनाऱ्यावर सिनेगॉग उभारणारे आणि कोकणी 'करां'ती आडनावं घेऊन इस्रायलला परतलेले ज्यू किंवा अगदी मराठी भाषक झालेले गोव्याच्या किनाऱ्यावरील हबशी, हे सगळेच थेट कोकणात आले आणि त्यांच्यावर कोकणी मातीतच देशीकरणाचे षोडशोपचार झाले. त्यामुळे या लाल मातीला स्थलांतरं नवीन नाहीत.


बदल स्वीकारत गेलो, तर प्रवाहीपण राहतं; नाहीतर माणसाचं काय किंवा समाजाचं काय डबकं होऊन जातं. पण बदल आंब्यावर पायरी-हापूसऐवजी शेवग्याचं कलम करणारे असले, तर मात्र ते झाडाच्याच मुळाशी येऊ शकतात. हेच मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये झालेलं आपण आज पाहात आहोत. या गल्लेभरूंच्या पाशवी स्थलांतरात सर्वांत पहिला बळी जातो तो स्थानिक संस्कृती आणि त्याचा अविभाज्य घटक असलेल्या भाषेचा. तो जाऊ द्यायचा नसेल, तर राजकीय नव्हे तर वैयक्तिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. कारण भाषेच्या काय किंवा धर्माच्या काय राजकारणाने मोठे होतात ते नेते आणि पक्ष; भाषा किंवा धर्म नव्हे. वर्षभर बंगळुरात राहिल्यानंतर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, दक्षिणेत त्यांच्या भाषा टिकवल्या त्या भाषकांनी नेत्यांनी नव्हे. तिथे प्रत्येक माणसाला आपल्या भाषेचा केवळ अभिमानच नाही, तर गरजही वाटते. आपल्या भाषेत आपल्याला अधिक चांगलं कळतं, व्यक्त होता येतं, याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळेच त्यांना एखादा दुकानदार आपली भाषा बोलत नाही म्हणून त्याला थोबडावून काढ, कधी २-५ टॅक्सी फोड, मातृभाषेच्या जतनासाठी परिसंवाद-संमेलनं घे, असल्या बोथट तलवारींनी लढावं लागत नाही. 'केवळ अभिनिवेश म्हणून नव्हे, तर स्वाभाविकरित्याच आम्ही आमच्या भाषेत चित्रपट पाहतो, तुमच्या भाषेतला तुम्ही डब करून आणलात तरच तो आम्हाला कळतो; तुम्ही आमच्या भाषेत विकायला आलात तरच आम्हाला तुमच्या वस्तू घेता येतील, नाहीतर आम्हाला व्यवहार करणंच कठीण आहे. हा अगदी कुठलाही गाजावाजा न करता बनून गेलेला घरोघरीचा स्वभावधर्मच आहे. त्यामुळे मी पत्रकारांशी हिंदीत बोलणार नाही, हा तिथला राजकीय स्टंट नसतो, तर सहजकर्म असतं आणि ते इथे येणाऱ्यांच्याही सहज अंगवळणी पडलेलं दिसतं. दोन-दोन पिढ्या मुंबईत राहूनही दुकानदार मराठीत ४ वाक्य बोलू शकत नाहीत. पण १०-१२ वर्षं दक्षिणेत राहिले की स्थानिक भाषेत सहज व्यवहार कसे करू शकतात, याचं उत्तरही या 'स्वभावधर्मातच' आहे.


एखाद्या मालिकेत कुणीतरी मुंबईची भाषा हिंदी आहे म्हटल्यावर आम्ही त्यांना धमकावतो, त्यांच्याकडून तोंडदेखली क्षमायाचना करवून घेतो आणि मराठीचं संवर्धन झाल्याच्या मस्तीत पुन्हा वावरायला लागतो. असले शेकडो तोंडपूजे माफीनामे सत्ताधाऱ्यांना पाठवून त्यांच्या नाकाखालून आपल्या स्वराज्याच्या ध्वज उभारणाऱ्या शिवछत्रपतींचा आदर्श नक्की घेतलाय तरी कुणी? बिनबोभाट कार्यसिद्धी महत्त्वाची की प्रसिद्धीचा भपका? तलवार की मखमली म्यान? करवंट्या की खोबरं? हे प्रश्न राजकारण्यांसाठी नव्हे, तर तुमच्या माझ्यासाठी आहेत. कारण राजकारण्यांना फक्त तलवार म्यानातून काढून व्यासपीठावर दाखवायची आहे. रोजची अटीतटीची लढाई लढायचीय ती, तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांना.


कोळ्यांच्या मुंबईत माशांचा वास सहन न होणाऱ्या वसाहती उभ्या राहिल्या आहेत आणि पर्युषण पर्वात मांसविक्री बंद ठेवण्याची सक्ती करण्यात येत आहे. दैनंदिन व्यवहारातील मराठीशी अन्य भाषकांची सोडाच, मराठी माणसाचीही नाळ केव्हाच तुटली आहे. एकंदरीतच आगरी-कोळ्यांच्या मुंबईचा तोंडवळा आपल्याला मराठमोळा राखता आलेला नाही, हे अपयशी वास्तव आता मान्य करून निदान अन्य ठिकाणी तरी वेळीच जागं होण्याची गरज आहे. नाहीतर मुंबईप्रमाणेच कोकणातही लवकरच 'पयल नमन'ऐवजी, 'हमार ललनवा' चे स्वर ऐकू येतील. शिमग्याऐवजी छटपूजेच्या वेळी कोकण गजबजेल आणि 'कोकणी माणसाचे मुख्य अन्न कोणते? या प्रश्नाचं उत्तर भात व मासे असं देता येईल, पण ते इतिहासाच्या पेपरात; भूगोल किंवा परिसर अभ्यासाच्या नव्हे!


© - संकेत सातोपे

शनिवार, १८ जुलै, २०२०

विकास दुबे आणि न्यायव्यवस्था



कानपूरचा गुंड विकास दुबे असो की हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपी, पोलिसांच्या गोळ्यांनी कुणी ठार झाले की समाजातील मोठ्या वर्गात समाधानाची आणि न्याय झाल्याची भावना निर्माण झालेली दिसते. त्यानंतर ‘न्यायव्यवस्थेला बगल देऊन केलेला हा ‘न्याय’ कसा घातक आहे’ ते ‘असाच झटपट न्याय झाला पाहिजे’ अशी नेहमीचीच परस्परविरोधी मतमतांतराची वावटळही उठताना दिसते. पण जनमत हे असे होण्याचे कारण काय? या मूलभूत गोष्टीबद्दल कुणी फारसे बोलताना दिसत नाही. न्यायालयात जाऊन न्याय मिळणार नाही, तो असा बाहेरच मिळवायला हवा, अशी जर समाजधारणा झाली असेल तर ती का झाली याचा शोध घेणे आणि ती दूर करण्यासाठी प्रयत्न करणे हे संबंधित व्यवस्थेचे कामच नाही का? पोलिसांनी कायदा हातात घेतला तर उद्या अराजक माजेल, असे म्हणताना जनतेचा न्यायपालिकेवरील विश्वास उडाल्यानेही असेच अराजक माजते हेही लक्षात घेतले पाहिजे.

शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, यासारख्या उक्तींमधूनही न्यायव्यवस्थेबाबतचा अविश्वासच प्रतित होत असतो. आपल्यावर होणारा शारीरिक, मानसिक वा सामाजिक अन्याय कोर्टात जाऊन दूर करून घेता येईल, असा विश्वास अशिक्षित, दीन-दुबळ्यांना सोडाच, पण सजग सुशिक्षितांनाही वाटत नसेल, तर ही व्यवस्था कुणासाठी आहे? आजोबांनी घातलेल्या दिवाणी दाव्यांचा निकाल नातवाच्या काळात लागल्याचे किस्से आपण घरोघरी गमतीने ऐकतो. चुकून-माकून न्यायालयाशी संबंध आलाच तर वकिलांची मुजोरी, तारीख-पे-तारीखच्या भानगडीत वेळ-पैशांचा बेसुमार अपव्यय, आपल्या बाजूने सोडा पण जो काही निकाल लागायचा आहे तो लागावा, या प्रतीक्षेत सरणारी उमेद, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून हा अविश्वास निर्माण होत आला आहे. म्हणूनच शिवीगाळ-छेडछाड-हाणामारी असो की एखादे मालमत्तेचे प्रकरण सर्वसामान्य माणूस आधी कोर्टाचे नव्हे, तर एखाद्या प्रभावी व्यक्तीचे पाय धरतो. यातूनच गावगुंडांना महत्त्व येते आणि पुढे त्यातलेच काही राजकारणात शिरून कायदे मंडळात जाऊन बसतात. ज्याची न्यायालयाबाहेरच भानगडी करण्याची आणि सोडवण्याची क्षमता अधिक तो सामान्यांचा मसिहा ठरतो. त्यामुळेच गुंड ठरवून गोळ्या घालण्यात आलेल्याच्या नावे रुग्णवाहिका फिरताना, सार्वजनिक उत्सव होताना दिसतात. अशा लोकांवर कारवाईलाही काही वेळा स्थानिकांचा विरोध होतो. या सगळ्या गोष्टी न्यायलय आणि जनता यांच्यातील दरी अधोरेखित करणाऱ्याच आहेत.

दुसरीकडे न्यायव्यवस्थेतील या दिरंगाईचा लाभ उठवणारेही लोक दिसतात. मग अनाठायी जनहित याचिका दाखल करणे, ठिकठिकाणी गुन्हे दाखल करून केवळ तारखा-तारखांना न्यायालयाचे खेटे मारायला लावून एखाद्या पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यापासून ते राजकीय विरोधकापर्यंत कुणालाही जेरीस आणणे, असले प्रकार केले जातात.

अन्यायाविरुद्ध न्यायालयात जायला घाबरणारे आणि कुणाला तरी वेठीला धरण्यासाठी न्यायालयात जाणारे या दोन्हीच्याही बुडाशी असतो न्यायव्यवस्थेतील दिरंगाईवरचा विश्वास! तो न्यायपालिकेच्या कार्यक्षमतेवर बसावा यासाठी राज्यकर्त्यांपासून ते नोकरशाहीपर्यंत सर्वांनी वेळीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यथा सध्या जागोजाग राजकीय संस्थानिक तयार झालेच आहेत, तसेच कोर्टाबाहेर न्याय करण्याची ही सवय उद्या भारताचे लोकशाही संघराज्य पुन्हा संस्थानिक राज्य केल्याविना राहणार नाही.



  • संकेत सातोपे

रविवार, १ मार्च, २०२०

तुम्ही कोणत्या गटातले? पुरोगामी की हिंदुत्ववादी?

दिल्लीत उसळलेल्या धार्मिक दंगलीमुळे केवळ मुसलमानांवर अन्याय झालाय. ते यातले खरे नुकसानग्रस्त आहेत. बाकी हिंदू वस्त्यांवर आणि सुरक्षा दलांच्या जवानांवर पूर्वनियोजितपणे झालेले हल्ले, त्यांची हत्याकांडे, या गोष्टींचा तसा फारसा गाजावाजा करण्यासारखे नाही. मुळात मुसलमानांनी हल्ले केले असे म्हणणेच, प्रतिगामी-धर्मांध किंवा मोदीभक्त असल्याचे लक्षण आहे. पण मुसलमानांवर हल्ले झाले असे म्हणणे धर्मनिरपेक्षतेचे लक्षण आहे. 'दंगलीत किंवा सामूहिक हिंसाचारात दंगेखोर समाजकंटक आणि सर्वसामान्य पीडित हे दोनच गट असतात,' हे वाक्य तोपर्यंतच योग्य आहे जोपर्यंत दंगेखोर प्रामुख्याने मुसलमान आणि पीडित प्रामुख्याने हिंदू असतात. हीच स्थिती उलट झाली की ते 'हिंदू हल्लेखोर' आणि 'मुस्लिम पीडित' होतात. मुस्लिम धर्मीय दहशतवाद्यांकडून हल्ले होत असतात, तोपर्यंत 'दहशतवादाला धर्म नसतो,' बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये हिंदू नावे सापडायला लागली की मात्र तो 'भगवा दहशतवाद' होतो. 'मशिदीतून नमाज' पडून घरी जाताना आपल्याला कशी मारहाण झाली, हे सांगणाऱ्याच्या चित्रफिती आघाडीच्या 'धर्मनिरपेक्ष, पुरोगामी' माध्यमांकडून पद्धतशीर प्रसिद्ध केले जातात. पण देशाच्या एका गुप्तहेर जवानाला नियोजितपणे २००-२०० वेळा भोसकून मुस्लिम गुंडांकडून मारले जाते, तेव्हा तो मात्र दंगलीतला बळी असतो.

या भंपकपणामुळे धर्मनिरपेक्षपणा, सर्वधर्मसमभाव या शब्दांचेच हसे होऊन बसले आहे. एखाद्याने स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवले रे म्हणवले की लगेच तो मोदीविरोधी, ३७० कलम रद्द करण्याविरोधी, तिहेरी तलाक रद्द करण्याविरोधी आणि अंतिमतः स्वतःला हिंदू म्हणवण्याविरोधीही असलाच पाहिजे; इथपर्यंत सगळ्यागोष्टी अध्याहृत असतात. उलट एखाद्याने स्वतःला 'हिंदुत्ववादी-प्रेमी' म्हटले की, त्याची शेपटी थेट नरेंद्र मोदी-संघ इथपासून नथुराम गोडसेपर्यंत नेऊन भिडवली जाते. 'सामाजिक ओळखी'चे दोनच पर्याय सध्या शिल्लक ठेवण्यात आलेले आहेत आणि असल्या सामाजिक प्रश्नावर 'समाजभान' असलेल्या प्रत्येकाने या दोनपैकी कोणत्या तरी एक गटात असणे बंधनकारक असते. किंबहुना एकदा एका प्रश्नावर एका गटाच्या जवळ जाणारी भूमिका घेतली रे घेतली की पुढच्या प्रत्येक प्रश्नावर तुम्ही त्या गटाला अनुकूल अशीच भूमिका घेणार हे गृहीत धरले जाते किंवा तसा वैचारिक दबाव तुमच्यावर आणला जातो.

एखादी व्यक्ती किंवा विचारधारा यांचा प्रभाव वाढण्यास हे वातावरण अत्यंत पोषक आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच देता येईल. त्यांनी पाकिस्तानात घुसून लष्करी कारवाया केल्या, याचा कोणाही भारतीयाला अभिमानच वाटणार ना? पण तो वाटला आणि तो तुम्ही व्यक्त केला, तर तुम्ही थेट मोदीभक्त गटात मोडले जाता. त्याउलट तुम्ही येनकेन प्रकारे त्याची टर उडवली किंवा शाहजोगपणे त्याकडे दुर्लक्षच केले, तर मात्र तुम्हाला पुरोगामी होण्याची संधी आहे. पण यामुळे मोदींचे काम सोपे झाले. कारण सहज नाकारता न येणारे पाकिस्तानला धडा शिकवण्याचे काम त्यांनी केले आणि त्यासाठी एकदा एखाद्याच्या तोंडून 'वाह' निघाले की झालाच त्याचा 'मोदीभक्त' म्हणून बाप्तिस्मा आणि झाला तो पुरोगाम्यांच्या कोंडाळ्यातला बाटगा!

चांगल्या गोष्टीला चांगले आणि वाईटाला वाईट, मग ती गोष्ट कोणत्याही धर्म-जाती-समुदाय वा व्यक्तीची असो; असे म्हणण्याऐवजी उगाच काथ्याकूट करत बसायचे आणि वास्तवाकडे दुर्लक्ष करायचे ही कथित पुरोगाम्यांची वृत्तीच आज हिंदुत्ववादी मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या खूप पथ्यावर पडली आहे. कोणत्याही प्रकारच्या ध्रुवीकरणाला अत्यंत अनुकूल पार्श्वभूमी उपलब्ध करून देणारी ही वृत्ती आहे. दिल्लीत 'आप'ने हे वेळीच लक्षात घेऊन, स्वतःचा बचाव करून घेतला.

हिंदुत्ववाद्यांची कथा काही फार वेगळी नाही. हिंदुत्व हे सवर्णीय वर्चस्ववादी आहे, त्याला ब्राह्मण्याची किनार आहे, असा प्रचार करून बहुजनांना हिंदुत्वाच्या कक्षेबाहेर ठेवण्याचे प्रयत्न सतत सुरू असताना आणि ते खोडून काढण्याचे प्रयत्न तोकडे पडताना दिसतात. आंतरजातीय विवाहांना विरोधातून होणारी हत्याकांडे, दलितांवरील अत्याचाराच्या घटना, अंधश्रद्धांतून होणारे अनिष्ट प्रकार, अशी प्रकरणे बाहेर येतात तेव्हा त्यावर सर्वांत आधी सच्चा हिंदुत्ववाद्याने तुटून पडणे गरजेचे आहे. ती पोकळी त्यांनी भरून न काढल्यामुळे कथित पुरोगामींच्या प्रचाराला बळ मिळते.

मुळात देशभक्ती, मुस्लिम धर्मांधता, फुटीरतावाद अशा जरा आपल्याला अडचणीच्या ठरू शकणाऱ्या प्रश्नांवर सुस्पष्ट उत्तरे देण्यापेक्षा त्याबाबत मोघम, गुंतागुंतीचे राहणे किंवा प्रतिप्रश्न करून, दुसऱ्या गटाचेही तसेच दुर्गुण दाखवून त्या प्रश्नांना बगलच देणे, ही सध्याच्या पुरोगाम्यांची एक शैलीच झाली आहे. असल्या प्रश्नांच्या बाबतीत पुरोगाम्यांची जी तऱ्हा तीच जातीयवाद, आंतरजातीय विवाह, दलित-आदिवासी अत्याचार, अंधश्रद्धा आदी बाबतीत हिंदुत्ववाद्यांची आहे. या दुतर्फा मोघमतेवर अमोघ उत्तरे शोधणारे आणि सर्वसामान्य भारतीयांना नवी वैचारिक, राजकीय, सामाजिक दिशा देणारे खरेखुरे पुरोगामी विचारवंत-नेते निर्माण होत राहणे, हीच या देशाच्या प्रगतीची गुरुकिल्ली असेल.

@ संकेत सातोपे

रविवार, १२ जानेवारी, २०२०

माहितीपट नव्हे, चित्रपट म्हणून 'तान्हाजी' पाहायला हवा!



तान्हाजी मालुसरेंचा पडद्यावर दाखवलेला इतिहास किती वस्तुनिष्ठ, पुरावेजन्य आदी गोष्टी बाजूला ठेवून केवळ एक 3D पट म्हणून पाहिल्यास त्याची भव्यदिव्यता अनुभवता येते. कोणताही चित्रपट बनवताना दिग्दर्शकाने स्वातंत्र्य घेणं स्वाभाविकच आहे, अन्यथा तो माहितीपट होईल आणि माहितीपटातून बॉलिवूडची व्यावसायिक गणितं साधणं कर्मकठीण! त्यामुळे कोणत्याही बॉलिवूड निर्मात्याने असे पट बनवावेत, ही मागणीचं मुळात अवास्तव; त्यातूनही बनवलेच तर ते विशिष्ट बुद्धीजीवींपर्यंतच मर्यादित राहतील. तळागाळातील प्रत्येकापर्यंत पोहचू शकणार नाहीत. कथा-कादंबऱ्या-चित्रपट यातून इतिहास जितका सहज-सुलभ सर्वांपर्यंत पोहोचतो तितका इतिहास ग्रंथांतून नाही, हे आपण मान्य करायला हवं. ग्रंथ अभ्यासकांसाठी असतात, सामान्य वाचकांना त्यात रस असेलच असं नाही. म्हणूनच सेतू माधवराव यांच्यापेक्षा 'श्रीमान योगी' लिहिणारे रणजित देसाई अधिकांना माहीत असतात, ते वाचलेले असतात.

यात फक्त एक आग्रह कायमच धरायला हवा, तो म्हणजे सिनेस्वातंत्र्य घेताना संबंधित महापुरुषाचे अवमूल्यन होऊ नये. ते 'तान्हाजी'मध्ये कुठेही झालेलं नाही. 'तान्हाजीं'च्या पराक्रमाची पांढरी रेघ उठून दिसावी, यासाठी उदयभानची कुवत अधोरेखित करणारे तसेच कोंढण्याचे महत्त्व प्रेक्षकांच्या मनावर ठसवणारे अनेक काल्पनिक प्रसंग पटकर्त्यांना घालावे लागले. पण त्यांनी ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर अन्याय केला, असं काही म्हणता येणार नाही. उदाहरणच द्यायचं झालं, तर चंद्रजी पिसाळ या पूर्णतः काल्पनिक व्यक्तिरेखेचं देता येईल. कोंढण्यासंदर्भात ही व्यक्तिरेखा निव्वळ काल्पनिक असली, तरीही पुढे संभाजी महाराजांनंतरच्या काळात सूर्याजी पिसाळ ही व्यक्ती स्वराज्यद्रोह करून औरंगजेबाला मदत करण्यासाठीच कुप्रसिद्ध आहे. पटकर्त्यांनी हे भान राखलं आहे. चित्रपटात मसाला म्हणून व्यक्तीरेखा उभी करतानाही हा संदर्भ विचारात घेतला आहे. हे इतकं केलं तरीही पुरे नाही का?

असे चित्रपट म्हणजे इतिहासाविषयी लोकांची उत्सुकता चाळावण्याचं माध्यम आहे. यातून जिज्ञासा चाळावलेले लोक नक्की पुस्तकं, माहितीपट वगैरे शोधून काढून नेमकी माहिती मिळवतात. 'पानिपत' चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी माझ्याकडून संबंधित पुस्तकांची नावं विचारून घेतली, कुठे मिळतील याची विचारपूस केली. असं होऊ लागलं की अशा चित्रपटांचे उद्देश सफल झाले, नाही का!

शतकोत्तरी गाठलेला बॉलिवूडचा ढुढाचार्य आता कुठे भारतीय इतिहासातील या सोनेरी पानांकडे वळू लागलाय, देशभरातील प्रेक्षकही त्याला भरभरून प्रतिसाद देत आहेत. अशा वेळी खुसपटं काढत बसायचं की, असे प्रयत्न उचलून धरायचे हे आपलं आपणच ठरवायला हवं.

- संकेत सातोपे

रविवार, २० जानेवारी, २०१९

कालचे आज नाही, आजचे उद्याला

गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर आपले १० वर्षांपूर्वीचे आणि सध्याचे फोटो टाकण्याची गमतीशीर टूम आलीए. नजीकच्या भूतकाळात म्हणजे गेल्या १० -१५ वर्षांत आपल्यात झालेले देहीक बदल अशा दोन छायाचित्रांतून चटकन दृष्टीस पडतात. पण याच काळात आपल्या दैनंदिन वापरातील तंत्रज्ञानात आणि त्याअनुषंगाने सवयी, आचार-विचार आणि शिष्टाचारांमध्येही किती अलगद बदल होत गेले ना! अगदी लहान – सहान गोष्टींमध्येही हे बदल इतके मांजराच्या पावलांनी आले की, बदलणाऱ्यांनाही त्याची जाणीव झाली नाही. आज जुनी छायाचित्रं पाहाताना होतं, तसंच काहीस या विनासायास झालेल्या बदलांकडे पाहूनही चकीत व्हायला होतं.
          आता हेच पाहा ना, मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या घराखाली उभं राहून, जोरदार बोंब मारून त्याला खाली बोलावणं किंवा आपण आल्याची वर्दी देणं, हे प्रत्येकाच्या हाती मोबाइल आल्यापासून किंवा कॉल स्वस्त झाल्यापासून, अचानक अशिष्टपणाचं होऊन बसलयं. आता घराखाली उभं राहून फोन लावला जातो आणि खिडकीतून हात दाखवत फोनवरून निरोपानिरोपी होते.
            अहो, कालपर्यंत मध्यमवर्गीय वस्तीमध्ये पुरुषांची हजामत करणाऱ्या दुकानांबाहेर बायामाणसं सहसा उभी राहात नसतं. इतकंच काय घरातल्या लहान मुलाला भादरायलासुद्धा बाबा घेऊन जात असतं. बायकांनी तिथे जाणं निषिद्ध वगैरे नव्हतं, पण सहसा तिथे बाईमाणूस फिरकत नसे. कॉलेजात असताना माझ्या एका मैत्रिणीला मी सलूनमध्ये दाढी करवून घेतो, दोन मिनिटं बाहेर बस म्हणालेलो तर ती किती वैतागली होती. आता अगदी झाकपाक सोडा, पण अनेक छोटेखानी ‘केशकर्तनालयां’मध्येही महिला-पुरुषांची परस्परांकडून सामाईक हमाजत किंवा चंपी चाललेली पाहायला मिळते. म्हटलं तर केव्हढा बदल आहे नाई हा!
            यावरूनच आणखी एक आठवलं,१०-१२ वर्षांपूर्वी खांद्यांवर मैत्रिणीच्या 'ब्रा'चे पट्टे दिसतायंत हे खुणेने सांगणं, हे एका चांगल्या मित्राचं लक्षण असे. ही अत्यंत खासगी गोष्ट मानली जायची, त्यामुळे ‘जवळ’चे हा विशेष दर्जा असणाऱ्या मित्रांनाच हे सांगण्याची परवानगी असायची. उर्वरित मंडळीसाठी असं काही दिसणं हीसुद्धा भारीच सेक्सी वगैरे गोष्ट असायची. काळ झरकन बदलला, फॅशनही बदलली; आज असे पट्टे गळ्यात घालण्याची किंवा पारदर्शक पट्टे हेतुपुरस्सर दाखविण्याची टूम आहे आणि ती इतक्या बेमालुमपणे स्वीकारलीही गेली की, पाहणाऱ्यांनाही हल्ली त्यात काही विशेष वाटत नाही.
           असाच एक वाहतुकीचा शिष्टाचार हल्ली हल्लीपर्यंत होता, काही प्रमाणात आहेही; तो म्हणजे दिवसा कुणाच्या दुचाकीचे दिवे सुरू दिसले की, चित्रविचित्र खाणाखुणा करून भरप्रवासात ते बंद करायला सुचविणे. आपण कुणाचे तरी अनावश्यक सुरू असलेले दिवे मालवायला लावल्यामुळे झालेल्या ऊर्जाबचतीचं केव्हढ अप्रुप असायचं सांगणाऱ्याच्या चेहऱ्यावर. पण आता केंद्राने नवा नियम आणला, त्यामुळे सर्व नव्या दुचाकींचे दिवे दिवस-रात्र सुरूच राहतात. किंबहुना या होतकरू समाजसेवकांची कळकळ लक्षात न घेता दिवे बंद करण्याची कळच कंपनीने दुचाकीवरून काढून टाकलेली आहे. त्यामुळे बिचाऱ्यांचा अगदीच हिरमोड झालाय.
            महिन्याकाठी नगदी मिळणारे वेतन धनादेशाच्या स्वरूपात मिळू लागले. इथवर ठीक होतं ओ! पण ते थेट बँक खात्यात जमा होऊन त्याचा संदेशच काय तो मोबाइलवर येऊ लागल्यामुळे मातृभक्त, कुटुंबवत्सलांची मोठी पंचाईत होऊन बसलीए! म्हणजे आधी कसं आई किंवा घरातल्या कर्त्या बाईच्या हातात पगाराचा धनादेश दिला आणि त्यांनी तो देवापुढे ठेवला की महिनाभराच्या श्रमाच सार्थक झाल्यासारखं वाटायचं. आज ती सोय राहिलेली नाही. हल्ली पगार झाल्याचं आपल्या आधी त्या ‘ईएमआय’वाल्यांना कळतं. पगार झाल्याचे आणि तो कापून गेल्याचे संदेश एकाच वेळी वाजतात. त्यामुळे पूर्वी महिनाअखेरीला टाके पडायचे; आता तर मासारंभापासूनच शिवायला सुरुवात करावी लागते.
            मित्र किंवा विशेषत: लाडक्या मैत्रिणीच्या आधी चित्रपटगृहाजवळ पोहोचून तिकीट काढून ठेवणं, शो हाऊसफुल होणार असेल, तर आदल्या दिवशीच तिथे खेप घालून तिकीट मिळवणं. रेल्वे तिकिटांच्या रांगेत एखाद्या देखण्या प्रवाशांच्या तिकिटाची जबाबदारी घेणं, दूरगावची तिकीट मिळवण्यासाठी रात्र खिडकीबाहेर बारदणावर झोपून काढणं, अशा अनेक गोष्टी नव्या तंत्रज्ञानामुळे हल्लीच्या हल्ली कालबाह्य झाल्या. ऑर्कुटवर आपली खरी छायाचित्र आणि याहू चॅट रुमवर आपलं खरं नाव लपविण्याचेही दिवस गेले. आपण नकळत सोशल मीडियाला इतके सोकावलो की, छायाचित्रच काय आपल्या आयुष्यातली प्रत्येक बारीक सारीक गोष्ट आपण इथे शेअर करू लागलो. हे चांगलं की वाईट, चूक की बरोबर हे माहीत नाही. पण झटपट बदल होतायंत, ते हे असे.
            हेच पाहा ना, फोनच होते तोवर आपण दूरच्या मित्रांना कोणत्याही शुभेच्छा फोनवरून द्यायचो. मात्र विशेष असणाऱ्या व्यक्तीला हाती लिहिलेलं पत्र पाठवणं भावनिक ओलाव्याच असायचं, आज आपण ‘एक मित्र’ गटात असणाऱ्यांना व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरून शुभेच्छा देतो आणि खास असणाऱ्यांना फोन करून. म्हणजे फोनवरून शुभेच्छा हा पूर्वीचा ‘दिवाणे आम’साठीचा प्रकार ‘दिवाणे खास’साठी उरलाय.
          एकंदरीत काय आपली इच्छा असो वा नसो, आपण कालपेक्षा आज वेगळे असतो आणि आजपेक्षा उद्या. हे बदल दिसण्याबाबत जितके खरे, तितकेच जगण्या- वागण्याच्या, नीती-अनीतीच्या, समाज - व्यवस्थेच्या प्रत्येकच पैलूंचाबाबतीतही!

© - संकेत सातोपे